प्रेमसंबंधाच्या आमिषातून तरुणींना जाळ्यात ओढल्याप्रकरणी शिरोलीतील तरुण ताब्यात

Spread the love

 पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

प्रेमसंबंधाचे आमिष दाखवून काही तरुणींना जाळ्यात ओढून त्यांचे व्हिडिओ तयार केल्याच्या गंभीर प्रकरणात हातकणंगले पोलिसांनी पुलाची शिरोली येथील २२ वर्षीय एका संशयित तरुणाला शनिवारी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात त्याच्या आणखी दोन साथीदारांचा सहभाग असल्याची चर्चा असून पोलिसांकडून तपास गोपनीय पद्धतीने सुरू आहे.विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुलाची शिरोलीतील एका तरुणाचे चांदीच्या शहर परिसरातील एका युवतीसोबत प्रेमसंबंध होते. या ओळखीचा गैरवापर करत संशयितांनी इतर काही युवतींशी संपर्क साधून त्यांना विश्वासात घेतल्याचा आरोप आहे. यामध्ये सुमारे आठ ते दहा युवतींना जाळ्यात ओढून त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.विशेष म्हणजे, या व्हिडिओंचा आधार घेत संबंधित युवतींना धमकावण्यात येत होते. हा प्रकार कोणाला सांगितल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. मात्र संशयितांच्या जवळच्या मित्रालाच या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर त्याने या प्रकरणाला वाचा फोडल्याचे सांगितले जाते.यानंतर पीडितांपैकी एका युवतीने धाडसाने पुढे येत तक्रार दाखल केली. त्यानुसार हातकणंगले पोलिसांनी तत्काळ हालचाल करत एका संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अनेक युवतींचे व्हिडिओ असल्याची माहिती समोर येत असून पोलिसांकडून याची पडताळणी सुरू आहे.या संदर्भात हातकणंगलेचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी एक जण ताब्यात असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असून अधिक तपास सुरू असल्याचे सांगितले. दरम्यान या प्रकरणाला वेगळे वळण लागल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. विविध अंगांनी या प्रकरणाचा तपास सुरू असून अनेक धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.सध्या पुलाची शिरोली येथे उरूस व यात्रा सुरू असल्याने परिसरात मोठी गर्दी आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हे प्रकरण हातकणंगले पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्याची चर्चा आहे. पोलिसांनी संवेदनशीलता राखून तपास सुरू ठेवला असून या प्रकरणाकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!