शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व ग्रामस्थांचे शिरोली पोलिस ठाण्यात निवेदन
पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
पुलाची शिरोली (ता. हातकणंगले) येथील एका तरुणाने अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे शारीरिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. संबंधित संशयितावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच या प्रकरणाचा सखोल तपास करून अन्य साथीदारांचाही शोध घ्यावा, अशी जोरदार मागणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली. याबाबत शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.मिळालेल्या माहितीनुसार, शिरोली पुलाची येथील संशयित शाहिद सनदे याने अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याशी जवळीक साधली. या संबंधातून त्याने संबंधित मुलींचे अश्लील फोटो व व्हिडिओ तयार करून त्यांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. या गंभीर प्रकाराची माहिती एका पीडित महिलेने धैर्याने पुढे येऊन पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर उघडकीस आली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संशयिताला अटक केली असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.या प्रकरणी संशयिताने हातकणंगले, इचलकरंजी, हुपरी, कोल्हापूरसह विविध ठिकाणांतील मुली व महिलांना फसवून जाळ्यात ओढल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. संबंधिताने विश्वास संपादन करून तरुणींना मानसिक व शारीरिकरीत्या त्रास दिला असल्याने या गुन्ह्याचा सखोल तपास करून आणखी पीडित पुढे येण्यास प्रोत्साहन द्यावे, अशीही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात, अशा प्रकारचे गुन्हे समाजासाठी घातक असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच या प्रकरणात संशयिताला अन्य कोणाचे सहकार्य लाभले आहे का, त्याचे इतर साथीदार कोण आहेत, अशा सर्व बाबींचा तपास करून संपूर्ण रॅकेट उघड करावे, अशी मागणी करण्यात आली.या घटनेमुळे शिरोली परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. समाजात अशा प्रवृत्तींना आळा बसण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत, दोषींना शिक्षा होईल याची खात्री द्यावी, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. यावेळी पोलिस प्रशासनाने प्रकरण गांभीर्याने घेत सखोल चौकशी सुरू असल्याचे सांगितले. दरम्यान, या प्रकरणामुळे परिसरातील सामाजिक संघटनाही सक्रिय झाल्या असून महिलांच्या सुरक्षिततेसाठी जनजागृती आणि कठोर कायदेशीर उपाययोजना राबविण्याची मागणी होत आहे. आरोपीविरोधात जलदगतीने खटला चालवून कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण, शिवप्रतिष्ठानचे जिल्हा कार्यवाह सुरेश यादव, गाव प्रमुख नितीन चव्हाण, बजरंग दलाचे संयोजक निलेश शिंदे, सचिन यादव, युवराज कुंभार, सुर्यकांत बोरगे, अनिकेत पाटील, भरत पाटील, भरत ठमके यांच्यासह शिवप्रतिष्ठानचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या प्रकरणाचा तपास पुढे कोणते धक्कादायक तपशील समोर आणतो, याकडे सर्व शिरोलीकरांचे लक्ष लागले असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी आता अधिक तीव्र झाली आहे.