प्राथमिक आरोग्य केंद्र पुलाची शिरोली येथे आरोग्य सभापतींची आढावा बैठक संपन्न

Spread the love

 पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

प्राथमिक आरोग्य केंद्र शिरोली पुलाची येथे नुकतीच जिल्हा परिषद कोल्हापूरच्या नवनिर्वाचित बांधकाम व आरोग्य सभापती मा.सौ.सारिका नांदेकर यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली.या बैठकीदरम्यान सभापती नांदेकर यांनी आरोग्य केंद्राची सखोल पाहणी करून विविध विभागांची माहिती घेतली.बैठकीच्या प्रारंभी वैद्यकीय अधिकारी डॉ.जेसिका अँड्रयूज यांनी प्रास्ताविकात आरोग्य केंद्राच्या कामकाजाचा आढावा मांडला.त्यांनी केंद्रांतर्गत येणारी लोकसंख्या, उपकेंद्रांची संख्या, कार्यक्षेत्रातील गावे तसेच रुग्णसेवेबाबतची माहिती सविस्तर दिली. यानंतर सभापती नांदेकर यांनी महिन्याला होणाऱ्या प्रसूतींची संख्या, ओपीडीची स्थिती, रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवा आणि औषध पुरवठ्याची माहिती जाणून घेतली.यावेळी त्यांनी आरोग्य केंद्राच्या विकासासाठी आवश्यक बाबींवर भर दिला.केंद्रात सौरऊर्जा प्रणाली बसविणे, निर्लेखित झालेल्या इमारतीचा पाठपुरावा करणे तसेच आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. याशिवाय, क्षयरोगग्रस्त रुग्णांना ‘निश्चय फूड किट’चे वितरण करण्यात आले. सभापती नांदेकर यांनी आरोग्य केंद्राच्या कामकाजाबद्दल तसेच कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेबद्दल समाधान व्यक्त केले.जिल्हा परिषद सदस्य सलिम महात यांनी आपल्या भाषणात आरोग्य केंद्रात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला चांगली व समाधानकारक सेवा मिळत असल्याचे सांगितले. त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुकही केले.या बैठकीस जिल्हा परिषद सदस्य सलिम महात, पंचायत समिती हातकणंगले सभापती सौ.आश्विनी बिरांजे,सदस्य अरुण माळी,सौ.सावर्डेकर,सौ.कमल कौंदाडे, ग्रामपंचायत पुलाची शिरोली सरपंच सौ. पद्मजा करपे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद दातार, मा. आकाश गिरी, समुदाय आरोग्य अधिकारी तसेच सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. पंकज पाटील यांनी केले. या बैठकीमुळे आरोग्य सेवेच्या उन्नतीसाठी आवश्यक दिशा मिळाल्याचे उपस्थितांनी सांगितले.

Leave a Comment

error: Content is protected !!