दत्तवाड परिसरात वादळी वाऱ्याचा तडाखा; वृक्ष उन्मळल्याने वाहतूक विस्कळीत,वीजपुरवठाही खंडित

Spread the love

महावितरणण कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे रात्रीत वीजपुरवठा सुरळीत;, ग्रामस्थांकडून कौतुक

दत्तवाड / हेरवाड

दत्तवाड आणि हेरवाड परिसरात गुरुवारी रात्री सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. ताशी ४० कि.मी. वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे परिसरातील अनेक मोठी झाडे मुळासकट उन्मळून पडली, तर अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला होता.या नैसर्गिक आपत्तीमुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांना रात्रभर कसरत करावी लागली.

मुख्य रस्ते झाले बंद 

​विजांच्या कडकडाटासह झालेल्या या वादळामुळे दत्तवाड-घोसरवाड मार्गावर मोठी झाडे रस्त्यावर कोसळली.यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना झाडे पडल्यामुळे पर्यायी मार्गांचा शोध घ्यावा लागला. हेरवाड परिसरातही काही ठिकाणी झाडे पडल्याने अडथळे निर्माण झाले होते,मात्र स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य राबवून हे अडथळे दूर केले.

​वीज कर्मचाऱ्यांची कर्तव्यनिष्ठा

​वादळामुळे वीजवाहिन्यांवर झाडे पडल्याने दत्तवाड परिसराचा वीजपुरवठा खंडित झाला होता.संपूर्ण परिसर अंधारात बुडालेला असताना महावितरणचे वायरमन अनिल वसवाडे आणि मनोज मोकाशी यांनी भर पावसात आणि रात्रीच्या अंधारात कौतुकास्पद कामगिरी केली.त्यांनी रात्री १ वाजेपर्यंत अथक परिश्रम घेऊन बिघाड दुरुस्त केला आणि गावाचा वीजपुरवठा सुरळीत केला.ग्रामस्थांकडून शाबासकी: ऐन संकटाच्या वेळी जीवाची पर्वा न करता सेवा देणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे आणि रस्ते मोकळे करण्यासाठी मदत करणाऱ्या स्थानिकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!