हेरवाड / प्रतिनिधी
शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कन्या विद्या मंदिर, हेरवाड या शाळेच्या विद्यार्थिनींनी ‘टॅलेंट प्लस सर्च’ परीक्षेत जिल्हा व तालुका स्तरावर घवघवीत यश संपादन करत शाळेचा नावलौकिक अधिक उंचावला आहे. या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरांतून विद्यार्थिनींचे कौतुक होत आहे.इयत्ता दुसरीतील विद्यार्थिनींनी विशेष चमक दाखवली आहे. वर्गशिक्षिका सौ. गीता अभय ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली कु. ओवी बिरु देबाजे हिने जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला, तर कु. हिरकणी हरीश बंडगर हिने जिल्ह्यात तृतीय क्रमांक मिळवला. कु. सानवी सागर उगारे आणि कु. माहिरा जावेद गलगले यांनी तालुका स्तरावर द्वितीय क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले.इयत्ता तिसरीतील विद्यार्थिनींनीही आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. वर्गशिक्षक श्री. दिलीप गणपती शिरढोणे यांच्या मार्गदर्शनाखाली कु. संचिका महेश कांबळे हिने जिल्ह्यात चौथा क्रमांक, कु. स्वरा संतोष पाटील हिने जिल्ह्यात पाचवा क्रमांक मिळवला, तर कु. आराध्या विक्रमसिंह देसाई हिने तालुका स्तरावर दहावा क्रमांक प्राप्त केला.शाळेच्या “सर्वांगीण गुणवत्तेची हमी” या ब्रीदवाक्याला साजेशी ही कामगिरी असून विद्यार्थिनींच्या परिश्रम, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यांचे हे उत्तम फलित मानले जात आहे. या यशासाठी गट शिक्षण अधिकारी सौ. भारती कोळी तसेच केंद्रप्रमुख सुभाष कुरुंदवाडे यांचेही प्रोत्साहन लाभले.या सर्व यशस्वी व बक्षीसपात्र विद्यार्थिनींचे शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व पालकांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. या यशामुळे कन्या विद्या मंदिर, हेरवाड शाळेचा शैक्षणिक दर्जा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.