हेरवाडमध्ये ८ व्या पोषण पखवाड्याचा सांगता समारंभ उत्साहात संपन्न

Spread the love

निवृत्त व गुणवंत सेविकांचा सत्कार आणि विद्यार्थ्यांचा विद्यारंभ सोहळा

 

हेरवाड / प्रतिनिधी

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत हेरवाड बीटमध्ये ८ व्या पोषण पखवाड्याचा सांगता समारंभ अत्यंत उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाच्या माध्यमातून माता-बाल पोषण,बालकांचा मेंदू विकास आणि अंगणवाडी सक्षमीकरण या विषयांवर जनजागृती करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.हेरवाड बीटच्या पर्यवेक्षिका सौ. संगीता चावरे यांनी प्रास्ताविकात पोषण पखवाड्याच्या मुख्य पाच थीम्सची माहिती दिली. यामध्ये प्रामुख्याने ० ते ६ वर्ष वयोगटातील बालकांचा विकास, पालकांचा ‘स्क्रीन टाइम’ कमी करणे आणि अंगणवाडी केंद्रांमध्ये लोकसहभाग वाढवणे यावर त्यांनी भर दिला.याप्रसंगी जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती श्रद्धाताई गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “बालकांचा शैक्षणिक पाया हा अंगणवाडीतच भक्कम होतो. जन्मापासूनच्या पहिल्या १००० दिवसांत होणारा विकास हा बालकाच्या आयुष्यासाठी निर्णायक असतो आणि यात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे योगदान मोलाचे आहे.”शिरोळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद कुरणे यांनी ग्वाही दिली की, “अंगणवाडीतील मुलांसाठी लागणारे शैक्षणिक साहित्य आणि अंगणवाडी इमारतींच्या दुरुस्तीसाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करू.” तसेच सामाजिक युवा नेते बंडू बरगाले यांनीही अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले.प्रकल्प अधिकारी अमृता मोराणकर, सरपंच रेखा जाधव व पर्यवेक्षिका भोसले मॅडम यांनीही उपस्थित पालक व सेविकांना मार्गदर्शन केले.

विविध उपक्रमांची रेलचेल

कार्यक्रमात अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आले:

सत्कार सोहळा: ई-लर्निंग उपक्रमात सातत्य ठेवून गोल्ड, सिल्वर आणि ब्राँझ सर्टिफिकेट मिळवलेल्या सेविकांचा विशेष सन्मान करण्यात आला.

निरोप समारंभ: निवृत्त सेविका व मदतनीस यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला.

विद्यारंभ: पहिलीत प्रवेश घेणाऱ्या चिमुकल्यांना ‘विद्यारंभ प्रमाणपत्र’ वाटप करण्यात आले.

सांस्कृतिक व सामाजिक: मुलांचा वेशभूषा कार्यक्रम आणि सर्वांनी मिळून ‘पोषण प्रतिज्ञा’ घेतली.

या सोहळ्याला उपसरपंच छायाताई गायकवाड,सदस्या विद्या माने,विस्तार अधिकारी अनिल घोडेस्वार,सर्व अंगणवाडी सेविका,मदतनीस आणि मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हेरवाड बीटमधील सर्व सेविका व मदतनीस यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Leave a Comment

error: Content is protected !!