शिरोळ / प्रतिनिधी
जागतिक वसुंधरा दिनानिमित्त शिरोळ नगरपरिषद आणि हौसाबाई होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज, निमशिरगांव यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि आरोग्यविषयक उपक्रमांची व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे.यावेळी उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांनी शिरोळ शहराला ‘माझी वसुंधरा’ अभियानात राज्यात प्रथम क्रमांकावर नेण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला.या मोहिमेची सुरुवात शहरातील स्मशानभूमीत १५ फूट उंचीच्या पिंपळाच्या वृक्षारोपणाने करण्यात आली.पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शहर हरित, स्वच्छ आणि आरोग्यदायी बनविण्यासाठी प्रशासनासोबत नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.शहराला ‘प्लास्टिक मुक्त शिरोळ’ बनविण्यासाठी शाळा व महाविद्यालयांच्या माध्यमातून प्लास्टिक संकलन मोहीम राबविण्यात येणार आहे. संकलित प्लास्टिकचा पुनर्वापर (रीसायकल) करून पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम कमी करण्याचा प्रयत्न होणार आहे.विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवून ही मोहीम व्यापक जनआंदोलनात रूपांतरित करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. स्वच्छता व्यवस्थापनासाठी ‘इफेक्टिव्ह मायक्रो-ऑरगॅनिझम्स’ (EM) तंत्रज्ञानाचा वापर करून कचऱ्याचे योग्य नियोजन केले जाणार आहे. कचऱ्यापासून सेंद्रिय कंपोस्ट खत तयार करण्याचे प्रशिक्षण नागरिकांना दिले जाईल. यामुळे कचरा व्यवस्थापन सुधारण्याबरोबरच शेतीसाठी उपयुक्त खत उपलब्ध होण्यास मदत होईल. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नैसर्गिक उपायांवर भर देण्यात येणार आहे. ‘लेमनग्रास’ तेलाच्या वापराबाबत मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. तसेच शहरातील प्रत्येक घरात हरित वातावरण निर्माण करण्यासाठी तुळशीच्या रोपांचे वाटप करण्यात येणार आहे.आरोग्य क्षेत्रातही विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या आरोग्यविषयक समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी विविध आरोग्य शिबिरे व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केले जातील. यामुळे नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांनी सांगितले की,शहराचा सर्वांगीण विकास आणि स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची आहे.‘माझी वसुंधरा’ अभियानात शिरोळला प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा.यावेळी तेजस मगदूम (व्हाईस चेअरमन, हौसाबाई होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज) आणि डॉ.अरुण चौगुले यांनी युवकांनी पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. युवकांच्या सहभागातून समाजात सकारात्मक बदल घडवून आणता येतात, असे त्यांनी नमूद केले.या सर्व उपक्रमांमुळे शिरोळ शहरात स्वच्छता, हरित विकास आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.प्रशासन आणि नागरिकांच्या संयुक्त प्रयत्नांतून ‘माझी वसुंधरा’ अभियानात शिरोळ शहर आपला ठसा उमटवेल,असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.