जागतिक वसुंधरा दिनानिमित्त शिरोळमध्ये “पिंपळ” वृक्षारोपणाचा अभिनव उपक्रम

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

२२ एप्रिल रोजी जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून शिरोळ नगरपरिषदेच्या वतीने ‘माझी वसुंधरा अभियान ७.०’ अंतर्गत स्मशान भूमीजवळ पिंपळ वृक्षाचे रोपण करून पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या कार्यक्रमासाठी पिंपळाचे रोप प्रसिद्ध डॉ. दयानिधी जैसवारा यांनी उपलब्ध करून दिले. त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना,ही वसुंधरा टिकली पाहिजे, हीच खरी काळाची गरज आहे,असा संदेश दिला.निसर्गातील प्रत्येक सजीव – मुंगीपासून – हत्तीपर्यंत निसर्गाचे नियम पाळतो, मात्र मानव आपल्या स्वार्थासाठी निसर्गावर आघात करत असल्याची खंतही व्यक्त करण्यात आली.या उपक्रमात लावण्यात आलेला पिंपळ वृक्ष (बोधी वृक्ष) विशेष महत्त्वाचा मानला जातो. इतर झाडांच्या तुलनेत अधिक प्रमाणात ऑक्सिजन देण्याची क्षमता असलेला हा वृक्ष हजारो वर्षे आयुष्य जगू शकतो,असे मानले जाते. त्याची हृदयाच्या आकाराची पाने आणि लांब देठ यामुळे वारा नसतानाही पाने हलताना दिसतात, ज्यामुळे परिसरात नैसर्गिक गारवा निर्माण होतो. या झाडावर विविध पक्षी आकर्षित होऊन घरटी बांधतात, खेळतात आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यात मदत करतात.स्मशानभूमीजवळ असे झाड लावण्यामागील हेतू म्हणजे परिसरात शांतता, शुद्ध हवा आणि नैसर्गिक वातावरण निर्माण करणे हा आहे.पर्यावरण दूत खंडेराव हेरवाडे व सचेतन बनसोडे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.त्यांच्या या प्रयत्नांमुळे स्थानिक पातळीवर पर्यावरणपूरक विचारांना चालना मिळत असून नागरिकांमध्येही वृक्षारोपणाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होत आहे. कार्यक्रमाला नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव,नगरसेवक विजय आरगे,साहिल मकानदार,तुकाराम पाटील व त्यांची टीम,राजेंद्र प्रधान,सम्यक फाउंडेशनचे संतोष कांबळे,अॅड.प्रणोदिप कांबळे तसेच जेष्ठ नागरिक कुंभार सर आदी मान्यवर उपस्थित होते.सर्वांनी मिळून वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित करत,भविष्यात अधिकाधिक झाडे लावण्याचा संकल्प केला.या उपक्रमामुळे शिरोळमध्ये पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल टाकण्यात आले असून, आज एक झाड,उद्या हिरवे भविष्य हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात यश आले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!