शिरोळ / प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) चे नेते आमदार रोहित पवार यांनी शिरोळ तालुक्यातील श्री दत्त साखर कारखान्यास सदिच्छा भेट देत येथील विविध उपक्रमांचा आढावा घेतला.या भेटीदरम्यान त्यांनी विशेषतः जमीन क्षारपड मुक्तीच्या कामाचे कौतुक करत लवकरच या प्रकल्पाची सविस्तर माहिती घेणार असल्याचे सांगितले.श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या क्षारपड मुक्ती प्रकल्पाने शिरोळ तालुक्यात उल्लेखनीय यश मिळवले आहे.यावेळी गणपतराव पाटील यांनी आमदार पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली.या प्रकल्पाअंतर्गत सुमारे दहा हजार एकर जमीन क्षारपडमुक्त करण्यात आली असून त्यापैकी चार हजार एकर क्षेत्रावर शेतकरी प्रत्यक्ष उत्पादन घेत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. या यशोगाथेमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली असून शेती अधिक सक्षम बनत असल्याचे त्यांनी नमूद केले.कारखान्याच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ऊस विकास योजना, सेंद्रिय कर्ब वाढविण्याचे प्रयत्न, सुपर केन नर्सरी, तसेच माती, पाणी व पानांचे परीक्षण या विविध उपक्रमांवरही यावेळी सखोल चर्चा झाली. मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाण्णा यांनी क्षारपड मुक्तीच्या कामाची तांत्रिक माहिती सादर केली.आमदार रोहित पवार यांनी या उपक्रमाचे कौतुक करत सांगितले की, “शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात येणारे हे काम अत्यंत महत्त्वाचे असून राज्यातील इतर भागांसाठीही हे आदर्श ठरू शकते.” त्यांनी लवकरच या प्रकल्पाचा अधिक सखोल अभ्यास करण्याची इच्छा व्यक्त केली.या प्रसंगी चेअरमन रघुनाथ पाटील, महेंद्र बागे, अशोकराव कोळेकर, रावसाहेब भिलवडे, दिलीप पाटील कोथळीकर, नितीन बागे, वरुण पाटील, पंडितराव काळे, बी. जी. माने, अंबादास नानिवडेकर, ए. एस. पाटील, अमर चौगुले यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.दरम्यान श्री दत्त साखर कारखान्याच्या माध्यमातून राबविण्यात येणारे उपक्रम शेती विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरत असून, या भेटीमुळे या कामाला अधिक चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.