पुलाची शिरोलीच्या लेकीची सायन हॉस्पिटलमध्ये एमडी पदव्युत्तर शिक्षणासाठी निवड

Spread the love

पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे

पेपर विक्रेता अशोक कांबळे यांची मुलगी कु. डॉ. आरती पूनम अशोक कांबळे हिने आपल्या जिद्दीच्या आणि अथक परिश्रमांच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिची मुंबई येथील सुप्रसिद्ध लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज जनरल हॉस्पिटल येथे एमडी (एम डी ) शिक्षणासाठी निवड झाली आहे. या यशामुळे परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.आरतीने नीट (एन.ई.ई.ट) परीक्षेत उत्तुंग यश मिळवत मुंबईतील नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश निश्चित केला. अत्यंत सामान्य कुटुंबातील पार्श्वभूमी असलेल्या आरतीचे वडील अशोक कांबळे हे पेपर विक्रीचा व्यवसाय करतात. मर्यादित साधनसामग्री आणि आर्थिक अडचणी असूनही त्यांनी मुलीच्या शिक्षणात कोणतीही तडजोड होऊ दिली नाही. आरतीनेही परिस्थितीवर मात करत अभ्यासात सातत्य ठेवले आणि आपले ध्येय गाठले.लहानपणापासूनच वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आरतीने शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणात नेहमीच उत्कृष्ट कामगिरी केली. एमबीबीएस शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने पुढील उच्च शिक्षणासाठी तयारी सुरू ठेवली. दिवस-रात्र परिश्रम घेत, मार्गदर्शक शिक्षकांचे मार्गदर्शन आणि कुटुंबियांचा पाठिंबा यांच्या बळावर तिने नीट पीजी परीक्षेत यश संपादन केले.आरतीच्या या यशाबद्दल कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच स्थानिक नागरिकांनी तिचे विशेष कौतुक केले आहे. “कष्टाला पर्याय नाही,” हे तिने आपल्या यशातून सिद्ध केले आहे, अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या. साध्या कुटुंबातूनही मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करता येतात, याचा आदर्श आरतीने घालून दिला आहे.या यशामुळे परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. आर्थिक अडचणी किंवा प्रतिकूल परिस्थिती ही प्रगतीस अडथळा ठरत नाही, तर जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कोणतेही ध्येय साध्य करता येते, हा संदेश आरतीच्या कामगिरीतून मिळतो. तिच्या पुढील शैक्षणिक आणि वैद्यकीय कारकिर्दीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, भविष्यात ती एक यशस्वी व संवेदनशील डॉक्टर म्हणून समाजसेवा करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!