कोरोची,चिपरी,जयसिंगपूर आणि इनाम धामणी येथे तब्बल ११० शोषखड्ड्यांची निर्मिती; स्वच्छतेचा आदर्श उपक्रम
शिरोळ / प्रतिनिधी
रेवदंडा, ता.अलिबाग,जि.रायगड येथील डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने १ मार्च २०२६ रोजी कोरोची,चिपरी,जयसिंगपूर आणि इनाम धामणी या भागांत भव्य शोषखड्डा अभियान राबविण्यात आले.सकाळी ८ ते रात्री ९ या कालावधीत अखंडितपणे चाललेल्या या उपक्रमात तब्बल ११० शोषखड्डे श्रमदानातून व विनामोबदला पूर्ण करण्यात आले.या अभियानामुळे सांडपाण्याची योग्य सोय नसलेल्या अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून परिसरातील स्वच्छतेला नवे बळ मिळाले आहे.भारताचे स्वच्छता दूत, महाराष्ट्र भूषण डॉ.श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी तसेच रायगड भूषण डॉ. श्री. सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. त्यांच्या प्रेरणेतून प्रतिष्ठानचे श्री सदस्य प्रत्येक ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन नागरिकांना शोषखड्ड्यांचे महत्त्व पटवून देत होते.सांडपाण्यामुळे होणारे आजार,पाण्याची नासाडी आणि परिसरात निर्माण होणारी दुर्गंधी या समस्यांवर शोषखड्डा हा प्रभावी उपाय असल्याचे त्यांनी समजावून सांगितले. अनेक ग्रामीण भागांत सांडपाण्याचा निचरा न झाल्यामुळे विषमज्वर, मलेरिया,डेंग्यू,गॅस्ट्रो यांसारख्या साथीचे रोग पसरण्याचा धोका वाढतो.अशा परिस्थितीत शोषखड्डा हा साधा पण परिणामकारक उपाय ठरतो. प्रतिष्ठानच्या सदस्यांनी स्वतः खड्डे खणून,आवश्यक मार्गदर्शन करून आणि नागरिकांच्या सहभागातून हे काम पूर्ण केले.समाजाच्या आरोग्यदायी भविष्यासाठी केलेले हे श्रमदान नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरले.डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान हे समाजाभिमुख कार्यासाठी ओळखले जाणारे प्रतिष्ठान आहे.सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत प्रतिष्ठान सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. वृक्षारोपण व संगोपन,विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे विनामूल्य वाटप,रक्तदान शिबिरे,निशुल्क आरोग्य तपासणी व उपचार शिबिरे,आरोग्यविषयक जनजागृती मोहिमा, पानपोया उभारणी,कालवे-सरोवरे-नद्या व धरणांमधील गाळ उपसा,स्पर्धा परीक्षा व व्यवसाय मार्गदर्शन शिबिरे, दुर्घटनाग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप तसेच शारीरिकदृष्ट्या अक्षम व मूकबधिर व्यक्तींना आवश्यक अवयव व उपकरणांचे वितरण असे अनेक समाजोपयोगी उपक्रम प्रतिष्ठान सातत्याने राबवत आहे.त्यापैकी स्वच्छता अभियान हा एक महत्त्वाचा आणि व्यापक उपक्रम आहे.स्वच्छतेच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत केंद्र सरकारने २६ जानेवारी २०१७ रोजी डॉ.श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करून गौरविले आहे.त्यांच्या नेतृत्वाखाली प्रतिष्ठानने स्वच्छतेबाबत व्यापक जनजागृती केली आहे.दिनांक १६ नोव्हेंबर २०१४ रोजी राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानाची नोंद Limca Book of Records मध्ये करण्यात आली होती,ही बाब प्रतिष्ठानच्या कार्याची साक्ष देते. स्वच्छतेबरोबरच स्वच्छतेबाबत सर्व स्तरांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या अभियानाचा मुख्य हेतू आहे. अस्वच्छतेमुळे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम आणि सरकारला करावा लागणारा प्रचंड खर्च लक्षात घेता समाजाने स्वयंस्फूर्तीने पुढे येणे आवश्यक आहे.“समाज हेच आपले कुटुंब आहे आणि त्याच्या आरोग्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे,” हा संदेश या अभियानातून देण्यात आला.राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेतून स्वयंशिस्त अंगीकारल्यास भारत जगातील सर्वात स्वच्छ आणि स्वच्छतेबाबत जागरूक देश म्हणून ओळखला जाईल,असा ठाम विश्वास डॉ.श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी व्यक्त केला आहे.जसे आपण आपले घर स्वच्छ व नीटनेटके ठेवतो, तसेच आपले गाव व शहर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे.सरकारी यंत्रणांच्या मर्यादा लक्षात घेता नागरिकांनी पुढाकार घेतल्यास स्वच्छ भारताचा संकल्प निश्चितच साकार होईल.कोरोची,चिपरी,जयसिंगपूर आणि इनाम धामणी येथे पार पडलेले हे शोषखड्डा अभियान म्हणजे केवळ खड्डे खणण्याचे काम नव्हे,तर स्वच्छतेच्या दिशेने उचललेले एक ठोस पाऊल आहे. नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे आणि प्रतिष्ठानच्या समर्पित प्रयत्नांमुळे या भागात स्वच्छतेची नवी चळवळ सुरू झाली आहे.समाजहिताच्या या कार्याबद्दल सर्व स्तरांतून प्रतिष्ठानचे कौतुक होत असून,भविष्यातही अशाच उपक्रमांद्वारे स्वच्छ,निरोगी आणि सुदृढ समाज निर्माण करण्याचा संकल्प प्रतिष्ठानने दृढ केला आहे.