उदगाव / प्रतिनिधी
महायुती म्हणून विधानसभा व जयसिंगपूर नगरपालिका निवडणुकीत ज्यांना मनापासून पाठिंबा दिला,त्याच लोकांनी माझे राजकीय अस्तित्व संपवण्याचा कट आखला आहे,असा घणाघाती आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते अनिल उर्फ सावकर मादनाईक यांनी केला आहे.आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे नाव न घेता त्यांनी उदगावमध्ये सुरू असलेल्या राजकीय डावपेचांवर थेट बोट ठेवले.उदगावमध्ये जाणीवपूर्वक राजकीय खेळी करून आपले राजकीय अस्तित्व कमी करण्याचा आणि राजकारणातून बाद करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप मादनाईक यांनी केला.हा सगळा प्रकार आता मतदारांच्या लक्षात आलेला आहे.त्यामुळे जनता जागी झाली आहे, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.जयसिंगपूर नगरपालिका तुमच्यासाठी महत्त्वाची असेल,तर उदगाव माझं गाव असून मला माझा मतदारसंघ का नको? असा थेट सवाल मादनाईक यांनी उपस्थित केला.उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून आपण आजपर्यंत सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.या मतदारसंघातून अनेक कार्यकर्त्यांना मोठ्या पदावर नेण्याचा इतिहास माझा आहे.जिल्हा परिषद सदस्यापासून अध्यक्ष,आमदार, खासदार होईपर्यंत ज्यांनी वाटचाल केली,त्या प्रत्येकाच्या पाठीशी मी प्रामाणिकपणे उभा राहिलो आहे,असेही मादनाईक म्हणाले.मात्र आज त्याच मतदारसंघात आपल्यालाच अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघ माझ्यासाठी केवळ राजकारण नाही,तर आत्मीयतेचा विषय आहे.मला इथे संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना याच मतदारसंघातील जनता योग्य वेळी उत्तर देईल,असा इशाराही त्यांनी दिला.आता हा संघर्ष केवळ नेत्यांपुरता न राहता थेट जनतेच्या न्यायबुद्धीवर सोडण्यात येणार असल्याचे संकेत मादनाईक यांनी दिले आहेत.उदगावच्या राजकारणात पुढील काळात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता यानिमित्ताने व्यक्त केली जात आहे.