अज्ञात कारखान्यांचा प्रदूषणाचा कहर! मळीमिश्रित सांडपाण्याने नदी गुदमरली; हजारो मासे मृत, नागरिकांच्या आरोग्यावर मोठा धोका

Spread the love

शिरोळ | प्रतिनिधी

मगावती ते कागवाड बायपास मार्गावरील ओढ्यामार्फत अज्ञात कारखान्यांकडून मळीमिश्रित व रसायनयुक्त सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोणतीही प्रक्रिया न करता हे दूषित पाणी ओढ्या-नाल्यांच्या माध्यमातून नदीत सोडले जात असल्याने परिसरातील जलप्रदूषणाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. या प्रदूषणामुळे नदीतील हजारो मासे मृतावस्थेत आढळून आल्याने पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत संबंधित कारखान्यांकडून लपूनछपून रसायनयुक्त सांडपाणी ओढ्यात सोडले जाते. या पाण्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नदीचे पाणी काळवंडले आहे. जलचरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून शेती, पशुधन आणि नागरिकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दूषित पाण्यामुळे त्वचारोग, पोटाचे विकार तसेच इतर संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.हा प्रकार सुरू असतानाही संबंधित यंत्रणांकडून प्रभावी कारवाई होत नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ, महसूल विभाग आणि संबंधित प्रशासनाने संयुक्त पाहणी करून ओढ्यामार्फत दूषित पाणी सोडणाऱ्या अज्ञात कारखान्यांचा तातडीने शोध घ्यावा, पाण्याचे नमुने तपासावेत आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी विश्वास बालीघाटे,शिवाजी मगदूम (आबा), सुभाष चौगुले, राजू मानगावे,यशवंत चंदूरे आणि दत्ता लाळगे पाटील यांनी आज केली आहे.प्रदूषण करणारे घटकांवर कारवाई न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!