पाच आरोपी एक वर्षासाठी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातून हद्दपार
पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे
कोल्हापूर जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रणावर प्रभावी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी गुन्हेगारांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.गुन्हे करणारे,बेकायदेशीर अग्निशस्त्रे व जिवघेणी हत्यारे बाळगून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांचे समूळ उच्चाटन करण्यावर भर देण्यात येत आहे.या आदेशानुसार पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता,अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.बी.धीरज कुमार व उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार श्रीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोली MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड व त्यांच्या पोलीस स्टाफने मोठी कारवाई केली आहे.शिरोली MIDC पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील सराईत गुन्हेगार टोळीवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत विनायक सुकुमार लाड उर्फ कोळी (वय २८, रा. विलास नगर, शिरोली पुलाची, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) टोळी प्रमुख असून त्याच्यासह अनिकेत सुकुमार लाड उर्फ कोळी (वय २४), आशिष लक्ष्मण वाडकर (वय २८, रा. नागांव), श्रीकांत महादेव कोळी (वय २७, रा. माळवाडी, शिरोली पुलाची) व राहुल उर्फ आकाश ईश्वर आयवळे (वय २९) या पाच जणांचा समावेश आहे.सदर आरोपींवर नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणे, गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभाग तसेच कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण केल्याचे आरोप होते. त्यामुळे त्यांना कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून भविष्यातही अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.