पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
शिये फाटा येथे अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर अरेरावी करत त्यांना शिवीगाळ व धमकी दिल्याची घटना शनिवारी सकाळी घडली.याप्रकरणी डंपर मालक रमेश सर्जेराव शिंदे (रा.शिये करवीर ) याच्यावर शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. १० जानेवारी) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हातकणंगलेचे तहसीलदार सुशिलकुमार बेल्हेकर,तलाठी अमोल कोटे आणि लिपिक गजानन मेघमाळे हे शिये फाटा परिसरात अवैध वाहतूक करणाऱ्या डंपरची तपासणी करत होते. यासाठी वाळू वाहतूक करणारा डंपर समोरून जात होता.यावेळी त्यांनी डंपर (क्र.KL01 BJ 4077) यास थांबवून त्याची चौकशी सुरू केली. डंपर चालकाने तात्काळ डंपर मालक रमेश शिंदे याला फोन करून बोलावून घेतले.घटनास्थळी आलेल्या रमेश शिंदे याने “तुम्ही आमचा डंपर का आडवला, कसा काय चेक करता?” असे म्हणून तहसीलदार बेल्हेकर व तलाठी कोटे यांना उद्धट भाषेत बोलून शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला.तर शासकीय कामात अडथळा निर्माण करत त्यांना बघून घेऊ अशी धमकीही दिली.या घटनेनंतर तलाठी अमोल विमलकुमार कोटे (वय ४४) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डंपर मालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३५२ आणि ३५१(२)(३) प्रमाणे गुन्हा नोंदव करण्यात आला आहे. या घटनेमुळे शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे फिर्यादी अमोल कोटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून संबंधित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिंदे करत आहेत.
गौण खनिज व्यावसायिक, डंपर चालक व मालकांची या भागात वाढली मुजोरी!
टोप कासारवाडी परिसरात कांही लोकांच्याकडून बेकायदेशीर अवैद्य गौण खनिजाचे राजरोसपणे उत्खनन केले जाते. हे व्यावसायिक शासनाची कोणत्याही प्रकारची परवानगी अथवा रॉयल्टी न भरता उत्खनन करीत आहेत. नागपूर अधिवेशनात राष्ट्रीय काँग्रेसचे गटनेते, आमदार सतेज पाटील यांनी अवैध गौण खनिज उत्खन व शासनाच्या बुडणाऱ्या महसुलाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर महसूल विभागाच्या वेगवेगळ्या पथकाकडून तसेच गौण खनिज व खनिकर्म विभागाकडून या भागात वारंवार तपासणी मोहीम राबविली जाते. त्या अनुषंगाने तहसीलदार बेल्हेकर यांनी शनिवारी तपासणी मोहीम राबविली असता शिये येथील डंपर मालकाने अरेरावीची भाषा व शिवीगाळ करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या भागातील कांही दगड खाण मालक व डंपर चालक यांची मुजोरी व दादागिरी किती वाढली आहे. हे या घडलेल्या घटनेवरून दिसून येते. अशा अवैध व्यावसायिकांच्यावर शासनाच्या सर्वच विभागाकडून कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांच्यातून होत आहे.