श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयात स्व.डॉ.सा रे पाटील यांना जयंतीनिमित्त अभिवादन

Spread the love

कुरुंदवाड / प्रतिनिधी

येथील नवभारत शिक्षण मंडळ संचलित श्रीदत्त कनिष्ठ महाविद्यालयात शिरोळ तालुक्याचे भाग्यविधाते, माजी आमदार स्व. डॉ. सा.रे.पाटील यांच्या १०४व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला. महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. आर. जे. पाटील यांच्या हस्ते स्व. पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी महाविद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री. एस. डी. मस्कर यांनी स्व. डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील यांच्या बहुआयामी कार्याचा विद्यार्थ्यांना परिचय करून दिला. ते म्हणाले,स्व.सा.रे. पाटील हे शिरोळ तालुक्याचे खरे अर्थाने भाग्यविधाते होते.सामाजिक,राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे योगदान अतुलनीय आहे.त्यांनी पुढे सांगितले की,स्व.प्राचार्य डॉ.पी.बी.पाटील यांच्या सहकार्याने श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयाची उभारणी करण्यात स्व. पाटील यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.शेतकरी,कष्टकरी,होतकरू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, हा त्यांचा मूलभूत हेतू होता. महाविद्यालयाच्या उभारणीच्या अडचणीच्या काळातही त्यांनी इमारत निर्मितीसाठी सातत्याने प्रयत्न केले. स्वच्छता आणि वृक्ष लागवडीची त्यांना विशेष आवड होती. त्यामुळे आजही दत्त कारखाना परिसरात स्वच्छता व हरित वातावरणाची परंपरा कायम असल्याचे त्यांनी नमूद केले.विधानभवनात ज्येष्ठ आमदार म्हणून त्यांची नोंद झाली होती, तसेच वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांनी विधान परिषदेची निवडणूक लढवून कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण केली होती असे मत एस डी मस्कर यांनी व्यक्त केले.कार्यक्रमानंतर महाविद्यालय परिसरात स्व.सा.रे.पाटील यांच्या स्वच्छतेच्या संकल्पनेप्रमाणे स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला.विद्यार्थी,विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.या कार्यक्रमास विभागप्रमुख एस.डी.भोजे, एस. डी. मस्कर, कु. वाय. डी. पिरजादे यांच्यासह सर्व शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. वातावरणात स्व. सा. रे. पाटील यांच्या स्मृतीला सन्मान देणारा भावनिक आणि प्रेरणादायी माहोल अनुभवायला मिळाला.

Leave a Comment

error: Content is protected !!