प्रतिनिधी / शिरोळ
२०१६ मध्ये जयसिंगपूर नगरपरिषदेत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या एकहाती सत्तेला ताराराणी आघाडीच्या माध्यमातून सुरुंग लावण्यात आला होता.त्या वेळी आमदार डॉ. अशोकराव माने यांच्या सुनबाई सौ.नीता माने या नगराध्यक्षपदी निवडून आल्या होत्या.त्या निवडणुकीत बहुमत राजर्षी शाहू विकास आघाडीच्या बाजूने गेले असले, तरी पुढील पाच वर्षे जयसिंगपूरमध्ये विकास कामांपेक्षा राजकारणाची झळ अधिक जाणवली.२०१९ व २०२४ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये मात्र पुन्हा यड्रावकर बंधूंचा प्रभाव ठळकपणे जाणवला.आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना सलग दोन वेळा विजयी व आरोग्य राज्यमंत्री करण्यामागे त्यांच्या बंधू संजय पाटील यड्रावकर यांची कुशल संघटनशक्ती आणि चाणक्य नीती महत्त्वाची ठरली.त्यामुळे आज शिरोळ तालुक्यात यड्रावकर बंधू हे प्रभावी राजकीय नेतृत्व म्हणून ओळखले जात आहेत. दरम्यान,आगामी शिरोळ नगरपरिषद निवडणुकीत पुन्हा एकदा माने घराण्यातील सदस्य मैदानात उतरले असून,आमदार डॉ.अशोकराव माने यांच्या सुनबाई सौ.सारिका माने या नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक रिंगणात आहेत.आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर व आमदार डॉ अशोकराव माने हे महायुतीच्या माध्यमातून सत्तेत असले तरी माने विरुद्ध यड्रावकर असा राजकीय रंग पुन्हा पाहायला मिळणार का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.विशेष म्हणजे,गेल्या काही महिन्यांपासून शिरोळ व जयसिंगपूर परिसरात विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी आमदार अशोकराव माने आणि संजय पाटील यड्रावकर हे एकत्र दिसत आहेत.त्यामुळे स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.२०१६ मध्ये जसे जयसिंगपूर शहरात सत्ता परिवर्तन होऊन घडलेले राजकीय पडसाद या निवडणुकीत पहायला मिळणार का? असा प्रश्न मतदारांमध्ये उपस्थित होत आहे.सध्या शिरोळ तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून,जयसिंगपूर,शिरोळ व कुरुंदवाड नगरपरिषदांमध्ये कोणत्या आघाडीची सत्ता येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.संजय पाटील यड्रावकर यांनी पुन्हा एकदा आपली चाणक्य नीती वापरून सर्व नगरपरिषदांवर एकहाती सत्ता मिळवली तर यड्रावकर बंधूंचे वर्चस्व अधिक बळकट होणार,यात शंका नाही. आगामी काही दिवसांत शिरोळ तालुक्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडण्याची चिन्हे दिसत असून,मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने लागतो,हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.