कुरुंदवाड / प्रतिनिधी
गेल्या पंचवीस वर्षांपासून कुरुंदवाड नगरपालिकेच्या निवडणुका पाहत असून, निवडणूक म्हणजे फक्त मतदान नव्हे तर आपल्या समाजासाठी जबाबदार लोकप्रतिनिधी निवडून देण्याची प्रक्रिया आहे, असे मत वार्ड क्रमांक ७, गवळी गल्ली येथील नागरिक अमित पाटील यांनी व्यक्त केले.आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक इच्छुक उमेदवार मैदानात उतरण्याची तयारी करत असताना, नागरिकांचा खरा प्रतिनिधी कोण असावा यावर चर्चा सुरू झाली आहे.याबाबत बोलताना अमित पाटील म्हणाले,लोकप्रतिनिधी हा फक्त निवडून आलेला व्यक्ती नसून,तो आपल्या वार्डातील प्रत्येक समाजघटकासाठी जबाबदार असावा.तीन महिन्यांतून एकदा वार्ड सभा घेऊन समस्यांचा आढावा घेणे,पाणी, रस्ता, वीज,गटारी,आरोग्य, स्वच्छता आणि सार्वजनिक स्थळांची देखभाल यासाठी प्रयत्न करणे ही त्याची जबाबदारी आहे. मात्र गेल्या पंचवीस वर्षांपासून वार्ड क्रमांक ७ मधून निवडून येणारे नगरसेवक हे वार्डाबाहेरील भागातील असतात, त्यामुळे स्थानिक समस्या आणि नागरिकांच्या अपेक्षा याकडे योग्य प्रकारे लक्ष दिले जात नाही. वार्डाचा खरा विकास साधायचा असेल तर लोकप्रतिनिधी हा वार्डातीलच असावा, आपल्या लोकांमध्ये राहणारा, त्यांच्या सुख- दुःखात सहभागी होणारा असावा,असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.पूर्वी या प्रभागाचे दोन भागांमध्ये विभाजन झाले होते,मात्र आता तो संयुक्त प्रभाग म्हणून अस्तित्वात आहे.त्यामुळे स्थानिक नागरिकांची एकमुखी अपेक्षा आहे की, या वेळी उमेदवार वार्डातीलच असावा.वार्ड क्रमांक ७ हे कुरुंदवाड शहरातील सामाजिक ऐक्याचे उत्तम उदाहरण आहे. शिवजयंती, गणेशोत्सव, नवरात्र, हनुमान जयंती, मोहरम, ईद, रमजान, मिलाद, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती-पुण्यतिथी अशा सर्व उत्सवांमध्ये सर्व समाजघटक एकत्र येऊन सहभागी होतात.शेवटी अमित पाटील यांनी सर्व गट, तट, पक्ष आणि संघटनांना आवाहन केले की, “या वेळी आमच्या वार्डातूनच उमेदवार द्या, जेणेकरून खऱ्या अर्थाने विकास आणि सर्वसमावेशक प्रतिनिधित्व घडेल असा विश्वास पाटील यांनी शेवटी व्यक्त केला आहे.