कोल्हापूर / प्रतिनिधी
ऊस दराच्या प्रश्नावर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेली पहिली बैठक निष्फळ ठरली आहे.दोन तास चाललेल्या चर्चेनंतर कोणताही तोडगा निघाला नसल्याने शेतकरी संघटना संतप्त झाल्या आहेत.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी बैठकीतील निष्कर्षावर नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्र्यांना थेट जाब विचारण्याचा इशारा दिला आहे.उद्यापासून एकही साखर कारखाना सुरू होऊ देणार नाही, असा गर्भित इशारा त्यांनी दिला.शेतकरी संघटनांनी ‘एफआरपी’ची मोडतोड करणाऱ्या साखर कारखान्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात ऊस दराचा मुद्दा चांगलाच तापला असून,सध्या कारखानदार ३४०० ते ३४५० रुपये पहिली उचल देण्यास तयार आहेत.मात्र ऊस परिषदेने निश्चित केलेला ३७५१ रुपयांचा दर मिळाल्याशिवाय गळीत हंगाम सुरू करू देणार नाही,असा निर्धार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला आहे.शेट्टी यांनी कार्यकर्त्यांना भूमिगत होऊन आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचे आदेश दिले आहेत.राज्य सरकारने साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांमध्ये मध्यस्थी करून तोडगा काढावा, ही आमची अपेक्षा होती.मात्र सरकार व कारखानदार या मुद्याकडे दुर्लक्ष करत आहेत, अशी टीका त्यांनी केली.दरम्यान,कर्नाटक सीमाभागातील बेळगाव व बागलकोट जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही ३७५१ रुपयांपेक्षा कमी दरात ऊस देणार नाही,असा निर्धार व्यक्त केला आहे.त्यांनी ऊस वाहतूक थांबवून अभूतपूर्व एकी दाखवली आहे.गतवर्षी साखर कारखान्यांनी साखरेसह उपपदार्थांमधून मोठा नफा मिळवला असून,यावर्षीही इथेनॉल, बगॅस व मोलॅसिसला चांगला दर मिळत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा,अशी एकमुखी मागणी सर्व संघटनांकडून होत आहे.