कोल्हापूर / प्रतिनिधी
ऊस दरावरून सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि कारखानदार यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.मात्र,या बैठकीत कोणताही ठोस तोडगा निघू शकला नाही.परिणामी, शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण असून ऊस दराचे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बैठकीदरम्यान आंदोलन अंकुश संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांनी कारखानदारांवर तीव्र शब्दात घणाघात केला. प्रत्येक वर्षी बैठकीच्या नावाखाली फक्त चर्चेचे गुऱ्हाळ चालते. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या घामाच्या मोबदल्याचे ठोस दरनिर्धारण होत नाही,अशी टीका त्यांनी केली.शेतकऱ्यांनी ४ हजार प्रति टन ऊसासाठी उचित दराची मागणी केली असली,तरी कारखानदारांनी आर्थिक अडचणींचे कारण देत कोणताही ठोस निर्णय घेतला नाही.परिणामी,बैठक निष्फळ ठरली, सरकारने तत्काळ मध्यस्थी करून ऊस दर ठरवला नाही, तर उग्र आंदोलनाचा इशारा दिला जाईल.दरम्यान, शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरल्याने ऊस उत्पादकांमध्ये असंतोष वाढत आहे.अनेक शेतकऱ्यांनी कारखान्यांना ऊस तोडणी थांबवण्याचा इशारा दिला आहे.सरकार आणि कारखानदारांनी लवकरात लवकर तोडगा काढावा, अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा चुडमुंगे यांनी दिला.शेतकरी आणि कारखानदार यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत असून, पुढील काही दिवसांत ऊस दराचे आंदोलन उग्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.