शेडशाळ / प्रतिनिधी
शेडशाळ येथील तरुण शेतकऱ्यांनी ऊस दरवाढीच्या मागणीसाठी सुरू केलेले आंदोलन अधिक तीव्र झाले असून, रात्रीच्या वेळी ऊस वाहतूक होऊ नये म्हणून तरुणांनी गस्त देत ऊस वाहतूक थांबवली आहे.रस्त्याशेजारी गस्तीसाठी उभारलेला मंडप कारखानदारांच्या तक्रारीनंतर जिल्हा पोलिसप्रमुखांनी बेकायदेशीर जागेत असल्याचे सांगत काढून टाकण्याचे आदेश दिले. कार्यकर्त्यांनी तत्काळ मंडप स्वतःच्या हद्दीत हलवला,मात्र गस्त बंद न करता आंदोलन सुरूच ठेवले.रविवार,दिनांक २ नोव्हेंबर रोजी रात्री साडेबारा वाजता कर्नाटकातील सभा आटोपून माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांना पाठबळ दिले.यावेळी शेट्टी म्हणाले, एकीकडे शेतकऱ्यांनी स्वतःच्या घामाच्या दामासाठी लढा उभारला आहे,तर दुसरीकडे कारखानदार पोलिसांचा वापर करून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहेत.हे अत्यंत निंदनीय आहे.ते पुढे म्हणाले,जिल्ह्यात मटका, दारू,गांज्या यांसारखे अवैध धंदे दिवसेंदिवस वाढत आहेत,तरी प्रशासन त्याकडे डोळेझाक करत आहे.उलट, ऊस दरवाढीसाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाईचा धाक दाखवला जातो.जर जिल्ह्याचे पोलिसप्रमुख खरोखर कर्तव्यदक्ष असतील,तर त्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक शाळा,कॉलेज परिसरातील गांजा विक्रीवर निर्बंध आणावेत, तसेच मटका,दारू व क्लबवर छापे टाकावेत.शेट्टींच्या भेटीनंतर आंदोलक शेतकऱ्यांचा उत्साह द्विगुणीत झाला असून,त्यांनी ऊस वाहतूक रोखण्याचा निर्धार कायम ठेवला आहे. दरम्यान,प्रशासन व कारखानदार यांच्यातील चर्चेची प्रतीक्षा सुरू आहे.