ऊसदराच्या प्रश्नावर अंकुश संघटना आक्रमक, उदगाव येथे यड्रावकर इंडस्ट्रीजकडे जाणारी ७ वाहने अडवली

Spread the love

प्रतिनिधी / शिरोळ

शिरोळ तालुक्यात ऊसदराच्या प्रश्नावरून तणाव वाढला आहे.मागील तुटलेल्या ऊसाला प्रतिटन २०० रुपये आणि चालू गळीत हंगामासाठी ४,००० रुपये दराची मागणी करत अंकुश संघटनेने ऊस आंदोलनाला सुरुवात केली आहे.ऊसदराचा तिढा अद्याप सुटलेला नसतानाही तालुक्यातील विविध साखर कारखान्यांनी ३,४०० रुपये प्रतिटन दर जाहीर करून गळीत हंगामास सुरुवात केली आहे.मात्र हा दर शेतकऱ्यांच्या अपेक्षेपेक्षा कमी असल्याने अंकुश संघटना व गरजवंत ऊस उत्पादक शेतकरी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मागणीनुसार दर मिळेपर्यंत ऊस वाहतूक सुरू होऊ देणार नाही, असा इशारा संघटनेने दिला असतानाही उदगाव चौकात चिपरी येथील यड्रावकर इंडस्ट्रीजकडे ऊस घेऊन जाणारी सात वाहने रविवार दिनांक २ नोव्हेंबर रोजी रात्री साडे अकरा वाजता संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी अडवली.या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला.घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सत्यवान हाक्के घटनास्थळी पोहोचले.त्यांनी ही वाहने पोलिस ठाण्यात घेऊन चला,त्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे तपासून कारवाई केली जाईल,असे सांगितले.मात्र कारवाई घटनास्थळीच करावी, अशी ठाम मागणी अंकुश संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांनी केली.यावरून पोलिस निरीक्षक हाक्के आणि आंदोलनकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद झाला.काही काळ परिस्थिती तणावपूर्ण बनली असली तरी पोलिसांनी समजूत काढत परिस्थिती नियंत्रणात आणली.अंकुश संघटनेचे पदाधिकारी म्हणाले की,ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्काचा दर मिळेपर्यंत हे आंदोलन सुरू राहील.संघटनाच्या आक्रमक भूमिकेमुळे सध्या ऊसदराच्या प्रश्नावर शिरोळ तालुक्यातील ऊस उत्पादक आणि साखर कारखानदार यांच्यात संघर्षाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!