प्रतिनिधी / उदगाव
उदगाव परिसरात रविवार दिनांक २ नोव्हेंबर रोजी दुपारीच्या सुमारास ऊस वाहतूक प्रकरणावरून तणाव निर्माण झाला.आंदोलकांना दमदाटी करून ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनधारकाची गाडी आंदोलकांनी थांबवली.ही घटना जयसिंगपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून,वाहनधारक हा स्थानिक आमदारांचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली.घटनेची माहिती मिळताच ट्रॅफिक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ सोडले,तर जयसिंगपूर पोलिस मात्र “हाताची घडी, तोंडावर बोट” अशा भूमिकेत राहिले.पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे आंदोलकांचा संताप अधिकच वाढला.शेवटी आंदोलकांनी संबंधित वाहनाला जागेवरच थांबवून आरटीओ अधिकाऱ्यांना बोलावण्याची मागणी केली. आंदोलकांच्या दबावामुळे आरटीओ पथक घटनास्थळी दाखल झाले आणि नियमभंगाबद्दल ऊस वाहतूक वाहनधारकावर २० हजार ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.या प्रकरणावर बोलताना आंदोलन अंकुश संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे म्हणाले,काही वाहनधारक आमदार किंवा कारखानदारांचे ऐकून ऊस वाहतूक करत आहेत.पण त्यामुळे त्यांचेच नुकसान होत आहे. प्रशासनाकडून दंड होतो,आंदोलकांचा रोष ओढवतो आणि शेवटी कोणीही मदतीला येत नाही.म्हणून अशा बेकायदेशीर वाहतुकीत सहभागी होऊ नका,असे आवाहन त्यांनी केले.दरम्यान,ऊस दरवाढीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला गती मिळत असताना काही जणांकडून वाहतूक सुरू ठेवल्याने शेतकरी व वाहनचालकांमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. पोलिसांनी तटस्थ भूमिका घेऊन कायदा सुव्यवस्था राखावी,अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.