प्रतिनिधी / चिंचवाड
करवीर तालुक्यातील चिंचवाड येथील स्मशानभूमीत अघोरी भानामतीचा प्रकार उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.अंधश्रद्धेच्या नावाखाली अशा घटनांमध्ये गेल्या काही दिवसांत वाढ होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.गांधीनगर चिंचवाड ते रुकडी रोडवर गावापासून सुमारे दीड ते दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या या स्मशानभूमीत शुक्रवारी रात्री काही अज्ञात तांत्रिक मंडळींनी अघोरी विधी केल्याचे समोर आले आहे.सामाजिक कार्यकर्ते सुनील भारमल यांच्या निदर्शनास हा प्रकार आला.घटनेच्या ठिकाणी सोललेला नारळ, त्यास लाल दोऱ्याने बांधलेली काळी बाहुली, समोर ठेवलेले दोन लिंबू, तसेच फोडलेले पाच नारळ आढळले. याशिवाय एका चिठ्ठीमध्ये काही लोकांची नावे लिहिलेली होती, अशी माहिती मिळाली आहे.याआधीही करवीर व हातकणंगले तालुक्यात अघोरी प्रकारांच्या घटना समोर आल्या होत्या. गडमुडशिंगी-वसगडे रोडवरील माळी मळ्यातील घटनेनंतर मौजे वडगाव स्मशानभूमीत शंभरहून अधिक लोकांची नावे लिहून अघोरी विधी करण्यात आला होता.इंगळी येथे तर काही युवकांनी प्राण्याचे काळीज कापून अंधश्रद्धेचा प्रकार केल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले होते. तसेच पुलाची शिरोली येथे एका मांत्रिकाने आत्मा बाटलीत बंद केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.या सर्व घटनांना फक्त काही दिवस होत असतानाच चिंचवाड येथील अघोरी प्रकार समोर आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्वात असूनही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने असे प्रकार वाढत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने या घटनांकडे वेगळ्या नजरेनेही पाहिले जात असून, पोलिसांनी संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिक व सामाजिक संघटनांकडून होत आहे.