प्रतिनिधी / शिरोळ
ऊस दरवाढीच्या मागणीसाठी शिरोळ शहरात ऊस आंदोलनाने जोर धरल्याने शनिवारी शिरोळ शहर बंद पाळण्यात आला.आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात वातावरण चांगलेच तापले असताना आज शिरोळ शहरात तब्बल दोन कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन सोहळे आयोजित करण्यात आले होते.या कार्यक्रमांना आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर उपस्थित राहणार असल्याची पूर्वतयारी कॉन्ट्रॅक्टर व संबंधित विभागांनी मोठ्या थाटात केली होती.मात्र, अपेक्षेप्रमाणे आमदार यड्रावकर शेवटच्या क्षणी गैरहजर राहिल्याने उपस्थितांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले.यामुळे कार्यक्रमाची रंगत काहीशी फिकी पडली.आमदारांच्या अनुपस्थितीत त्यांचे बंधू व माजी नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर यांनी उपस्थित राहून विकासकामांचे उद्घाटन करून कार्यक्रम संपन्न केला.दरम्यान,आमदारांनी अचानक पाठ फिरवल्याने शहरात विविध चर्चांना ऊत आला आहे.ऊस दराच्या प्रश्नावर शेतकरी संघटनांनी आंदोलन तीव्र केलेले असताना,आंदोलक आमदारांचा घेराव करतील या भीतीने त्यांनी कार्यक्रम टाळला का,असा प्रश्न जनतेत विचारला जात आहे.ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या न्याय्य असून शासनाने तातडीने त्यावर निर्णय घ्यावा,अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून होत आहे.शहर बंद असूनही उद्घाटन कार्यक्रम पार पडला असला, तरी आमदारांच्या गैरहजेरीने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या तर्कवितर्कांना ऊत आला आहे. याबाबत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.तर ऊस दराच्या प्रश्नावर आमदार यड्रावकर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.