प्रतिनिधी – शिरोळ
शिरोळ व परिसरातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे न ऐकता तसेच परवडणारा दर न देता कारखाने चालू करण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. कारखानदारांकडून ऊसदर ठरवताना शेतकऱ्यांचा सहभाग न घेता एकतर्फी निर्णय घेतला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.ज्या ऊस उत्पादकांच्या जीवावर हे साखर कारखाने चालू आहेत, त्यांनाच योग्य दर मिळत नाही, ही शेतकऱ्यांची मोठी अन्यायकारक परिस्थिती आहे,असे मत अनेक ऊस उत्पादकांनी व्यक्त केले आहे. कारखानदारांनी ऊसाचा दर ३४०० प्रति टन असा ठरवला असला, तरी यावर्षीचा उत्पादनखर्च, मजुरी दर, खत, औषधे व वाहतूक खर्च यांचा विचार करता हा दर परवडणारा नाही,असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.याच पार्श्वभूमीवर “आमच्या ऊसाचा दर कारखानदारांनी नाही तर आम्ही ठरवणार” या निर्धाराने युवा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.जस कारखानदारांचं ठरलं ३४००, तसंच शेतकऱ्यांचं ठरलंय ३८०० या टॅगलाईनखाली शनिवारी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी तख्त, शिरोळ येथे शिरोळ तालुका युवा ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे.या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा, ऊसदरविषयी शेतकऱ्यांची भूमिका आणि शासनाकडे पाठपुरावा यावर सविस्तर चर्चा होणार आहे.युवा ऊस उत्पादक धीरज शिंदे यांनी शिरोळ व परिसरातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.दरम्यान, या हालचालींमुळे यंदाच्या हंगामात ऊसदराचा प्रश्न चांगलाच तापण्याची चिन्हे दिसत आहेत. शेतकरी संघटनांचे नेते, कारखानदार आणि शासन यांच्यात ऊसदरावरून संघर्ष होण्याची शक्यता वाढली असून,येत्या काही दिवसांत शिरोळ तालुका ऊस आंदोलनाचे केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे.