उदगाव बनावट नोटा प्रकरणी तिघांना ३ नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी, ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

Spread the love

जयसिंगपूर / प्रतिनिधी

जयसिंगपूर पोलिसांनी उदगाव परिसरात छापा टाकून बनावट नोटा तयार करणाऱ्या तिघांना अटक केली आहे.ही कारवाई गुरुवारी मध्यरात्री करण्यात आली.अटक करण्यात आलेल्यांमध्ये साहील रफिक मुल्लाणी (वय 26, रा.उदगाव ता.शिरोळ),ओंकार बाबुराव तोवार (रा.इचलकरंजी,सध्या दानोळी) आणि रमेश संतराम पाटील (वय 29, रा. जुना चंदूर रोड, इचलकरंजी) यांचा समावेश आहे. पोलिसांनी या तिघांना जयसिंगपूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 3 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उदगाव येथील गट क्रमांक 145 मधील एका गोट्यात तसेच इचलकरंजी येथील बरगे मळा परिसरात छापा टाकण्यात आला.या कारवाईदरम्यान 100 रुपयांच्या हुबेहुब दिसणाऱ्या बनावट नोटा (एकूण 684) तसेच नोटा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले.जप्त केलेल्या साहित्यामध्ये HP Smart Tank 525 मॉडेलचा प्रिंटर, प्लॅस्टिक स्केल, कटर, कागद आदींचा समावेश आहे.या कारवाईत पोलिसांनी 68,400 रुपयांच्या बनावट नोटा आणि 19,600 रुपयांचे साहित्य असा एकूण 88,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.या प्रकरणी पोलीस हवालदार प्रकाश नारायण हंकारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जयसिंगपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.आरोपी हे बनावट चलन तयार करून बाजारात खपविण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तातडीने ही कारवाई करण्यात आली.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माने हे करत आहेत.या कारवाईमुळे बनावट नोटा तयार करणाऱ्याच्यात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!