शिरोळ / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ नगर परिषदेत यंदा होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून,छत्रपती शिवाजी महाराज युवा विकास आघाडीचे संस्थापक प्रमोद ऊर्फ बाळासाहेब लडगे यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडी आणि भारिप बहुजन महासंघ पुरस्कृत या आघाडीने लडगे यांच्या नेतृत्वाखाली मागील निवडणुकीत सशक्त पॅनेल उभं करून प्रस्थापितांना जोरदार टक्कर दिली होती.त्यामुळे यंदाही शिरोळ नगर परिषदेच्या राजकारणात लडगे हे ‘किंग मेकर’ म्हणून उदयास येणार असल्याची स्पष्ट चिन्हं आहेत.लडगे यांची रणनीती, आघाड्यांशी होणाऱ्या चर्चा,आणि ते कोणती भूमिका घेतात,याकडे सर्वच राजकीय गटांचे लक्ष लागले आहे.विशेषतः राजर्षी शाहू आघाडी,महायुती,महाविकास आघाडी तसेच यादव गट आणि पाटील गट यांनीही लडगे यांच्या संपर्कात राहण्यास सुरुवात केली आहे.प्रसंगी कठोर भूमिका घेऊन सामाजिक प्रश्नांवर लढा देणारे आणि युवकांच्या प्रश्नांवर सक्रिय राहणारे लडगे हे अनेक नवमतदारांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत.त्यांच्या नेतृत्वात स्थापन झालेली छत्रपती शिवाजी महाराज युवा विकास आघाडी ही शिरोळमध्ये एक भक्कम पर्याय म्हणून पुढे आली आहे. त्यामुळे त्यांचा आगामी निवडणुकीतील निर्णय कोणाच्या पारड्यात वजन टाकतो,हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.दरम्यान,लडगे यांनी अद्याप स्पष्ट भूमिका घेतलेली नसली तरी राजकीय हालचालींना वेग आला आहे.अनेक संभाव्य उमेदवार, स्थानिक पुढारी, व सामाजिक कार्यकर्ते लडगे यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.त्यामुळे शिरोळ नगर परिषद निवडणुकीत लडगे यांची पुढील भूमिका कोणती,याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.