यवलूज / प्रतिनिधी
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री.शशिकांत आडनाईक यांनी तब्बल ५०० कार्यकर्त्यांसह जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला.या प्रवेशाने पन्हाळा तालुक्यातील राजकीय समीकरणांना मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या कार्यक्रमात जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते व आमदार डॉ. विनय कोरे (सावकर), हातकणंगलेचे आमदार व दलितमित्र डॉ. अशोकराव माने (बापू), पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम, तसेच कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयसिंह माने (भैय्या) यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी कोल्हापूर बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश देसाई, संचालक पांडुरंग काशीद, कोल्हापूर शेतकरी संघाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, संचालक प्रधान पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश पाटील, शंकर पाटील, मानसिंग पाटील, पन्हाळा पंचायत समितीचे माजी सदस्य बाजीराव पाटील – रांगडे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमात बोलताना शशिकांत आडनाईक यांनी सांगितले, “आमदार डॉ. कोरे यांच्या नेतृत्वाखाली विकासाभिमुख व कार्यकर्त्यांना न्याय देणारी राजकारणाची दिशा जनसुराज्य शक्ती पक्ष देतो आहे. त्यामुळे मी आणि माझ्या ५०० कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.या प्रवेशामुळे पन्हाळा तालुक्यात जनसुराज्य शक्ती पक्षाची ताकद वाढली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर याचा ठसा उमटण्याची शक्यता आहे.