जयसिंगपूर / प्रतिनिधी
ऊस दराचा तिढा अद्यापही सुटलेला नसतानाच शिरोळ तालुक्यातील चिपरी येथील एका खाजगी खांडसरीने गाळप हंगामाला सुरुवात केली आहे.दरवर्षीप्रमाणे यंदाही ऊस दरावर शेतकरी आणि साखर कारखानदारांमध्ये तणावाचे वातावरण असून,हमी दराबाबत कोणतीही स्पष्टता नसताना ऊस वाहतूक सुरू झाली आहे.दर न जाहीर करता उसाने भरलेली वाहने कारखान्याच्या दिशेने जात असल्याचे चित्र आहे.या प्रकारामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बालेकिल्ल्यातच ऊस गाळप हंगाम सुरू झाल्याने स्वाभिमानीचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या आंदोलनाची धार कमी झाली असल्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात रंगली आहे.ऊस दरावर निर्णायक भूमिका घेणाऱ्या शेट्टींनी यंदा २४ व्या ऊस परिषदेच्या माध्यमातून पहिल्या उचल म्हणून प्रति टन ३७५१ रुपयांची जोरदार मागणी केली होती.मात्र दराशिवाय उसाची तोड सुरू झाल्याने शेतकऱ्यांत अस्वस्थता आहे.काही भागात शेतकरी कारखानदारांवर दर न ठरवता उसाची जबरदस्तीने तोड करून घेतल्याचा आरोप करत आहेत.ऊस गळीत हंगाम सुरू केल्यामुळे राजू शेट्टी काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.