शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ शहराच्या विकासात मोठा वाटा उचललेल्या जगदाळे कुटुंबीयांकडे गेल्या काही वर्षांपासून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने,शहरातील नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.विशेषतः नगरपालिका सभागृहात या कुटुंबीयांना मागील पाच वर्षांपासून कोणतेही प्रतिनिधित्व न मिळाल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढला आहे.शहरातील सार्वजनिक हिताच्या अनेक कामांमध्ये आपले योगदान देणाऱ्या जगदाळे कुटुंबीयांनी शिरोळमध्ये जिल्ह्यातील एकमेव सुसज्ज अशी स्मशानभूमी उभारण्यासाठी निस्वार्थपणे स्वतःची जमीन दिली.या स्मशानभूमीचा लाभ आज हजारो नागरिकांना होत असून,पावसाळ्यात होणारी गैरसोय कायमची मिटवण्यात यश आले.मात्र, एवढे योगदान असूनही या कुटुंबीयांचा राजकीय पातळीवर योग्य सन्मान झालेला नाही.शहरातील सत्ताधारी असोत वा विरोधक,कोणत्याही गटाने या कुटुंबाचा सन्मानपूर्वक विचार न केल्याची भावना जनतेतून व्यक्त होत आहे.त्यामुळं आगामी नगरपरिषद निवडणुकीत जगदाळे कुटुंबात उमेदवारी देऊन त्या कुटुंबाच्या कार्याची योग्य दखल घ्यावी,अशी मागणी मतदारांमधून जोर धरू लागली आहे.सध्या शहरात नगरपालिका निवडणुकीची तयारी सुरू असून,इच्छुक उमेदवारांची चाचपणी गटांकडून सुरू आहे.अशा परिस्थितीत विकासासाठी निस्वार्थीपणे कार्य करणाऱ्या कुटुंबीयांना स्थान देणे ही वेळेची गरज असल्याचे स्पष्ट होत आहे.शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या कुटुंबीयांना राजकीय प्रतिनिधित्व मिळाल्यास,सामाजिक योगदानाचे जिवंत उदाहरण समाजासमोर उभे राहील,अशी अपेक्षा सामान्य मतदार व्यक्त करत आहेत.