शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील आलास अकिवाट गुरुदत्त साखर कारखाना ते टाकळीवाडी दरम्यान कृष्णा नदीवर होणाऱ्या मोठ्या पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन नुकतेच मोठ्या थाटामाटात पार पडले.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांतदादा पाटील प्रमुख उपस्थितीत होते.मात्र,या उद्घाटन सोहळ्याला शिरोळ तालुक्याचे आमदार डॉ.राजेंद्र पाटील – यड्रावकर यांना निमंत्रण न देण्यात आल्यामुळे यड्रावकर समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.या प्रकारामुळे स्थानिक राजकीय वातावरणात खदखद जाणवत असून,यड्रावकर गटातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.या प्रकरणी प्रतिक्रिया देताना आमदार डॉ.यड्रावकर म्हणाले, “मला या भूमिपूजन कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका मिळाली नाही,त्यामुळे मी कार्यक्रमाला गेलो नाही. कार्यक्रमात कोणाला बोलवायचे, हे संबंधितांचे वैयक्तिक निर्णय असतात. पुलाचे काम त्यांनी मंजूर करून आणले आहे.त्यामुळं कोणाला बोलवायचं,कोणाला पत्रिका द्यायची की नाही तो त्यांचा निर्णय आहे.पण अशा महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी तालुक्याच्या लोकप्रतिनिधीला निमंत्रण देणे अपेक्षित होते.”तसेच, “सागर कन्स्ट्रक्शनचे कॉन्ट्रॅक्टर आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने देखील मला माहिती दिली नाही.तरीसुद्धा मी नाराज नाही.मी काम करणारा माणूस आहे,हे जनतेला माहिती आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भूमिका मांडली.आमदार यड्रावकर यांनी जरी संयमित प्रतिक्रिया दिली असली, तरी त्यांच्या समर्थकांमध्ये मात्र संतापाचे वातावरण आहे. आमदारांना डावलून भूमिपूजन केले जात आहे,हे लोकशाहीस अपमान करणारे आहे,अशा प्रतिक्रिया समर्थकांकडून येत आहेत.आगामी निवडणुकीत आपले महत्व वाढवण्यासाठी शिरोळ तालुक्यात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे राजकीय महत्व कमी करण्याचा काहींचा घाट घातला जात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आगामी नगरपरिषद,जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत निवडणुकीत शिरोळ तालुक्यात संघर्ष पहायला मिळणार हे मात्र नक्की