शिरोळ | प्रतिनिधी
शिरोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागा वाटपाचा फॉर्मुला जवळपास निश्चित झाला आहे.जयसिंगपूर नगर परिषद राजर्षी शाहू विकास आघाडीला देण्यात आली असून,शिरोळ व कुरुंदवाड नगरपरिषदा भाजपकडे सोपवण्याचे ठरले आहे. या निर्णयाची अधिकृत घोषणा 18 ऑक्टोबर रोजी शिरोळ येथील भाजप मेळाव्यात,उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे.तथापि,शिरोळ नगरपरिषदेतील उमेदवारी ठरवताना भाजपला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.जगात क्रमांक एकच्या पक्षाचा दावा करणाऱ्या भाजपला येथे इतर गटांचा पाठिंबा घ्यावा लागत असल्याचे चित्र आहे.नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत असलेल्या सौ.सारिका अरविंद माने व माजी नगराध्यक्ष डॉ.अरविंद माने हे राजर्षी शाहू आघाडीचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. यामुळे भाजपमधील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ.अरविंद माने नेमके कोणत्या गटात आहेत, असा संभ्रम कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर शहरातील विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी भाजप आणि शाहू आघाडीच्या नगरसेवकांनी गैरहजेरी लावल्याचे दिसून आले. त्यामुळे नाराजीचे पडसाद आगामी निवडणुकीत उमटण्याची शक्यता आहे.या सर्व घडामोडींमुळे शिरोळ नगरपरिषदेमध्ये भाजपचे नेतृत्व कोण करणार, हा प्रश्न मतदारांपुढे निर्माण झाला आहे. अंतर्गत मतभेद आणि गोंधळाच्या पार्श्वभूमीवर भाजपला सशक्त उमेदवार आणि नेतृत्वाची दिशा ठरवणे ही मोठी कसरत ठरणार आहे.