हातकणंगले / प्रतिनिधी
हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील हुपरी, वडगाव नगरपरिषद व हातकणंगले नगरपंचायतीला नगरविकास विभागाच्या “वैशिष्ट्यपूर्ण योजना” अंतर्गत पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने (बापू) यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश लाभले असून, या निधीमुळे मतदारसंघातील नागरी सुविधांचा स्तर उंचावणार आहे.हुपरी नगरपरिषदेला २ कोटी रुपये, वडगाव नगरपरिषदेला २ कोटी रुपये आणि हातकणंगले नगरपंचायतीला १ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. हुपरीमध्ये सामाजिक सभागृह,स्मशानभूमी, पाणी मीटर वितरण,बगीचा विकास,भंडारखाना आदी कामे हाती घेतली जाणार आहेत.वडगावमध्ये भाजी मंडईसाठी स्वतंत्र इमारत उभारण्यात येणार असून, त्यातून स्थानिक व्यापाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.हातकणंगले नगरपंचायतीत विरुंगळा केंद्र,शौचालय,निवारा शेड, सभामंडप, कब्रस्थान शेड, स्मशानभूमीतील बैठक व्यवस्था आदी कामांसाठी निधी वापरण्यात येणार आहे.या निधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार आणि आमदार डॉ. विनय कोरे सावकर यांचे आमदार डॉ. माने यांनी आभार मानले आहेत.“शासनाच्या विविध योजनांमधून मतदारसंघात विकासाची गंगा वाहती ठेवण्याचा आमचा प्रयत्न असून, नागरी व ग्रामीण भागातील प्रश्न तातडीने सोडवले जातील,”असे आश्वासनही डॉ. माने यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिले.