शिरोळ नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रभागातील नागरिकांचा पाठिंबा
शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीत वार्ड क्र. ७ मधून सौ.नाजनीन परवेज मेस्त्री यांनी निवडणूक लढवावी,अशी मागणी प्रभागातील नागरिकांमधून जोर धरत आहे.त्यांच्या पतींनी ग्रामपंचायत सदस्य असताना केलेल्या उल्लेखनीय कामगिरीच्या पार्श्वभूमीवर ही मागणी अधिक बळावत आहे.परवेज मेस्त्री यांनी सा.रे.पाटील आणि यादव गटाकडून आरोग्य व दिवाबत्ती (लाईट) विभागाच्या सभापती पदाची जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळली होती.त्यांच्या कार्यकाळात शिरोळमध्ये प्रथमच घंटागाडी सेवा सुरु करण्यात आली. या सेवेचे काटेकोर नियोजन करून नागरिकांनी त्यांच्या भागातील स्वच्छतेबाबत सह्यांची नोंद घेण्याची नवी पद्धत सुरु केली.त्यामुळे कचरा रस्त्यावर न टाकता घंटागाडीतच टाकण्याकडे लोकांचा कल वळवण्यात यश आले.घंटागाड्या वेळेवर येतात की नाही, हे सुनिश्चित करण्यासाठी नागरिकांना थेट कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक देण्यात आले.२५ ते ३० सफाई कामगारांच्या सहाय्याने संपूर्ण गाव कचरामुक्त करण्यात आले.घंटागाड्या व ट्रॅक्टरसाठी लागणाऱ्या डिझेलसाठी रिक्विझिशन प्रणालीचा अवलंब करून ‘प्रति किलोमीटर-प्रति लिटर’ असा हिशेब लावण्यात आला आणि डिझेल खर्चात तब्बल ५०% बचत करण्यात आली.दिवाबत्ती विभागातही तितकीच कार्यक्षमता दाखवत, स्ट्रीटलाईटसंदर्भातील तक्रारी एका दिवसात निकाली निघाव्यात, यावर कटाक्ष ठेवण्यात आला.या कार्यशैलीमुळे परवेज मेस्त्री यांची ओळख एक प्रामाणिक, सरळमार्गी आणि विकासाभिमुख लोकप्रतिनिधी म्हणून निर्माण झाली.हीच पारदर्शक व प्रभावी कामगिरी लक्षात घेता,सौ.नाजनीन मेस्त्री या देखील वार्ड क्र.७ मध्ये विकासाचा पाया मजबूत करतील, असा विश्वास व्यक्त करत त्यांच्या उमेदवारीची जोरदार मागणी प्रभागातून होत आहे.