शिरोळ नगरपरिषद निवडणूक भाजप ‘कमळ’ चिन्हावरच लढवणार ?

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

शिरोळ नगरपरिषदेची स्थापना झाल्यानंतर प्रथमच भारतीय जनता पक्षाने ‘कमळ’ चिन्हावर निवडणूक लढवली होती.मात्र,अंतर्गत कुरबुरींमुळे केवळ 33 मतांच्या फरकाने नगराध्यक्षपद पक्षाच्या हातून निसटले होते.आठ नगरसेवकांची विजयी घोडदौड असतानाही काही मतांमुळे भाजप उमेदवार पराभूत झाले होते.आता मात्र 2025 मधील नगरपरिषद निवडणुकीत भाजपने पुन्हा ‘कमळ’ चिन्हावरच निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.याबाबतच्या हालचाली वरिष्ठ पातळीवरून वेगाने सुरू झाल्या आहेत.यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील शनिवार, 18 ऑक्टोबर रोजी शिरोळ तालुक्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत शिरोळ,जयसिंगपूर व कुरुंदवाड या तीनही नगरपालिकांमध्ये भाजप ‘कमळ’ चिन्हावरच निवडणूक लढवणार का, याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.शिरोळ शहरासह जयसिंगपूर व कुरुंदवाड या शहरी भागांमध्ये भाजपच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांत विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.रस्ते,ड्रेनेज, पाणीपुरवठा अशा महत्त्वाच्या कामांना वेग मिळाल्यामुळे स्थानिक जनतेत भाजपविषयी सकारात्मकता वाढली आहे.भाजपच्या माजी नगरसेवकांपासून ते जुन्या कार्यकर्त्यांपर्यंत अनेकांनी पक्षश्रेष्ठींना ‘कमळ’ चिन्हावर निवडणूक लढवण्याची मागणी केली होती.पक्षाचा गड मानल्या जाणाऱ्या या भागात भाजपने वेळेवर संघटनात्मक तयारी केली,तर यंदा नगराध्यक्षपदासह अधिकाधिक प्रभागांत यश मिळवण्याची शक्यता आहे.दरम्यान,शिरोळ तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची बैठकही याच पार्श्वभूमीवर पार पडली असून,कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीसंदर्भात उत्साहाचे वातावरण आहे.चंद्रकांतदादांच्या दौऱ्यात या तिन्ही नगरपालिकांसाठी निवडणुकीची रणनिती ठरवली जाणार असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांकडून मिळाली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!