शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ येथील होऊ घातलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी तयारीला जोर धरत असून, वार्ड क्रमांक ४ मधून सौ. वर्षा रुपेश मोरे या इच्छुक उमेदवार म्हणून चर्चेत आहेत. यादव ग्रुपच्या कार्यामध्ये सक्रिय सहभाग असणाऱ्या आणि सामाजिक व राजकीय क्षेत्रात चांगला प्रभाव असणाऱ्या युवा उद्योजक रुपेश मोरे यांच्या त्या पत्नी आहेत.रुपेश मोरे हे गेली अनेक वर्षे अनिलरावजी यादव व पृथ्वीराजसिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असून, कट्टर यादव ग्रुपचे समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. स्थानिक पातळीवर त्यांचा व्यापक जनसंपर्क आहे आणि विविध सामाजिक कार्यांमधून त्यांनी युवकांमध्ये विशेष ओळख निर्माण केली आहे.सौ. वर्षा मोरे या देखील महिलामंडळाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी राहिल्या असून, महिलांमध्ये त्यांचा चांगला संपर्क व विश्वासार्हता आहे. वार्ड क्रमांक ४ मधील नागरिकांशी त्यांचा प्रत्यक्ष संवाद सातत्याने सुरू असल्यामुळे त्या या निवडणुकीत मजबूत दावेदार ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.या पार्श्वभूमीवर रुपेश मोरे यांनी आपल्या पत्नीला उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. “सामाजिक कार्यातून लोकांशी असलेली जवळीक आणि महिलांमध्ये असलेला जनाधार लक्षात घेता, सौ. वर्षा मोरे या प्रभावी उमेदवार ठरतील,” असे मत त्यांनी बोलताना व्यक्त केले.सध्या यादव ग्रुपमध्ये उमेदवारीसाठी विचारमंथन सुरू असून, वार्ड क्रमांक ४ मधून सौ.वर्षा मोरे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता प्रबळ असल्याचे बोलले जात आहे.