कोंडीग्रे / प्रतिनिधी
कोंडीग्रे (ता. शिरोळ) : गावातील दीड वर्षाच्या कृष्णराज रोहित बोरगावे याने अवघ्या वयात २०० पेक्षा अधिक कार्ड्स अचूक ओळखून एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. या उल्लेखनीय कामगिरीची नोंद इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये झाली असून, त्याला सर्टिफिकेट, पुरस्कार आणि पदक देऊन गौरविण्यात आले आहे.कृष्णराज हा रोहित आणि प्रियांका बोरगावे यांचा सुपुत्र असून, अगदी लहान वयापासून त्याला चित्रं, वस्तू आणि कार्ड्स पाहण्यात विशेष रुची होती. जेव्हा त्याच्याच वयातील इतर मुले मोबाईल, खेळणी किंवा टीव्हीकडे आकर्षित होतात, तेव्हा प्रियांका बोरगावे यांनी त्याच्या या वेगळ्या आवडीची दिशा ओळखून त्याला प्राणी, पक्षी, भाज्या, फळे, रंग, आकार, देशांचे झेंडे आणि वाहनांची ओळख करून देणारी विविध कार्ड्स दाखवून त्याचे शिक्षण सुरु केले.विशेष म्हणजे, इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्सच्या निरीक्षणा दरम्यान कृष्णराजने केवळ दोन मिनिटांत २०० हून अधिक कार्ड्स अचूकपणे ओळखून नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित केला. एवढ्या लहान वयात अशी बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्ती दाखवणारा कृष्णराज हा आजवरचा सर्वात कमी वयाचा विक्रमवीर बालक ठरला आहे.कृष्णराजच्या या अद्वितीय यशामुळे कोंडीग्रे गावाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचले आहे. गावकरी, नातेवाईक आणि संपूर्ण परिसरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्याच्या पालकांचे विशेष कौतुक होत आहे. कृष्णराजचे हे यश अनेक पालकांना आपल्या मुलांच्या क्षमतांकडे लक्ष देण्यासाठी प्रेरणा देणारे ठरणार आहे.”