शिरोळ / प्रतिनिधी
दत्त सहकारी साखर कारखान्याच्या व्यवस्थापनावर तीव्र टीका करत आंदोलन अंकुश संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांनी आज,बुधवार दिनांक २४ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता कारखान्याच्या कामकाजावर घणाघात केला.५० वर्षांपूर्वी ऊस उत्पादकांनी आपल्या ऊसाला चांगला दर मिळावा,वेळेवर ऊसतोड व्हावी म्हणून आपल्या खिशातील पैसे लावून कारखाना उभारला.पण आजही शेतकऱ्यांना त्याचा काहीही फायदा झालेला नाही. त्याला जबाबदार म्हणजे वर्षानुवर्षे कारखान्याच्या खुर्च्यांवर बसलेले चेअरमन,संचालक व कार्यकारी संचालक आहेत,” असा थेट आरोप चुडमुंगे यांनी केला.चुडमुंगे यांनी सांगितले की, कारखान्याने गेल्या वर्षी सुमारे ४० कोटी फक्त व्याजावर खर्च केला. १० लाख टन गाळप करूनही शेतकऱ्यांना दर टनाला ४०० रुपयांचा तोटा बसला.तसेच,नव्याने बायोगॅस प्रकल्प उभारण्यासाठी ५० कोटी कर्ज घेण्याची तयारी आहे, त्यासाठी शेतकऱ्यांना मिळणारे कंपोस्ट खत बंद करण्यात येणार आहे.“शाश्वत ऊस विकासाच्या नावाखाली हे विश्वस्त शेतकऱ्यांचाच गळा घोटत आहेत,”असेही ते म्हणाले. विज प्रकल्पाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, खाजगी कंपनीकडून ७ रुपये दराने विकली जाणारी वीज आता कारखाना ताब्यात घेतल्यावर ४.५० रुपये दराने विकली जाणार आहे.मागील वर्षी ११ कोटींचा नफा देणारा हा प्रकल्प यावर्षी केवळ २ कोटींवर आला असून लवकरच तो तोट्यात जाण्याची शक्यता आहे.खाजगी कंपनीने हुशारीने हा प्रकल्प हातातून काढून त्यांचा तोटा टाळला, आणि आमच्या विश्वस्तांनी तो आपल्या गळ्यात घेतला.तरीही ते म्हणतात आम्ही चांगलं चालवत आहोत,”अशी टीका करत चुडमुंगेंनी कारखान्याच्या व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.