मुंबई / प्रतिनिधी
मुंबई मंत्रालय येथे जलसंपदा विभागाच्या विविध प्रलंबित प्रकल्पांबाबत बैठक घेण्यात आली.राज्याचे जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.या बैठकीस जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघाचे आमदार डॉ.विनय कोरे (सावकार) व हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.अशोकराव माने (बापू) यांनी उपस्थित राहून संबंधित प्रकल्पांवर सविस्तर चर्चा केली.या बैठकीत कडवी नदीवरील सावे (ता.शाहूवाडी) प्रकल्प व वारणा नदीवरील खोची (ता.हातकणंगले) येथील को.प. बंधाऱ्याच्या माध्यमातून रामलिंग पठार पाणी उपसा प्रकल्पावर सकारात्मक चर्चा झाली. या दोन्ही प्रकल्पांसाठी तीन आठवड्यांच्या आत सर्वेक्षण करून तांत्रिक मान्यता देण्याचे आदेश प्रधान सचिवांनी दिले आहेत.सावे येथून जुळेवाडी खिंडीतून पाणी उचलून बंदिस्त पाईपलाईनद्वारे सुमारे ५,००० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. तर खोची बंधाऱ्यातून रामलिंग पठार येथे पाणी उपसा करून अंदाजे १०,००० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजन असून, वंचित क्षेत्रांसाठी शासकीय उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्याचेही सूचित करण्यात आले.या महत्त्वपूर्ण बैठकीस माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, शेतकरी संघाचे माजी अध्यक्ष अमरसिंह माने, सुहास राजमाने, गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे सचिव आणि जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल होणार असल्याचा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.