शिरोळ / प्रतिनिधी
जयसिंगपूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या ८ सप्टेंबर रोजी झालेल्या वाढदिवसानिमित्त शिरोळ तालुक्यात विविध ठिकाणी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर डिजिटल शुभेच्छा फलक लावले होते.परंतु वाढदिवसानंतर तब्बल बारा दिवस उलटूनही हे फलक न हटविल्यामुळे नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती.या पार्श्वभूमीवर एका स्थानिक व्यापाऱ्याने “साहेबांचा वाढदिवस ८ सप्टेंबर रोजी झाला असेल,तर कृपया डिजिटल बोर्ड काढून घ्यावेत” अशी सुचक पोस्ट ‘नगरपालिका समस्या’ या सोशल मीडिया ग्रुपवर केली.ही पोस्ट अल्पावधीतच व्हायरल झाली असून,शिरोळ तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे.या पोस्टची तात्काळ दखल घेण्यात आली आणि काही तासांतच शिरोळ येथील जय भवानी चौकात लावण्यात आलेला डिजिटल फलक हटवण्यात आला.यामुळे व्यापारी व वाहनचालक वर्गातून समाधान व्यक्त होत असून, रस्त्यावरील वाहतुकीला आता अडथळा राहणार नाही,असे स्थानिकांनी सांगितले.वाढदिवसानिमित्त लावले जाणारे फलक हे सार्वजनिक ठिकाणी अडथळा ठरत असल्याने संबंधितांनी वेळेत ते हटवावेत, अशी माफक अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.”वाढदिवस साजरा करा,फलक लावा,पण वाढदिवसानंतर दोन दिवसांत फलक हटवा” अशी भावना सध्या सर्वसामान्य व्यापारी आणि नागरिक व्यक्त करत आहेत.फलक लावण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायती व नगरपालिकांची परवानगी घेतली गेली असली तरी,हे फलक दीर्घकाळ रस्त्यावर राहिल्यामुळे व्यवसायिक व वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत होता.स्थानिक प्रशासनानेही वाढदिवसानंतर तातडीने फलक हटवण्याबाबत कोणतीही कारवाई केली नव्हती,यामुळे नाराजी वाढली होती.या घटनेमुळे भविष्यात सार्वजनिक ठिकाणी लावले जाणारे फलक वेळेत काढावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत असून,प्रशासनानेही याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.