मौजे आगर / प्रतिनिधी
मौजे आगर येथील शाहू विकास सेवा संस्थेची ६५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी संस्थेच्या कार्यालयात संपन्न झाली.या सभेत विविध विषयांवर चर्चा झाली. यामध्ये विषय पत्रिकेतील विषय क्रमांक 9 अंतर्गत गोडाऊन दुरुस्तीचा ठराव मंजूर करण्यात आला.मात्र या ठरावाबाबत सभासदांमध्ये अनेक शंका निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.सध्या संस्था स्पर्धात्मक परिस्थितीतून वाटचाल करत असून, शासनाचे नित्यनेमाने येणारे आदेश,बदलते धोरण,व त्यातून निर्माण होणारे नवीन आर्थिक व प्रशासकीय प्रश्न या पार्श्वभूमीवर सदस्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. गोडाऊनच्या दुरुस्तीसाठी सिमेंट व लोखंडी पत्रा घालायचा की स्लॅब टाकायचा,जुने साहित्य काढून त्यातून किती रक्कम मिळेल,अशा अनेक बाबींची माहिती अद्याप अस्पष्ट असल्याचे सभासदांचे म्हणणे आहे.संस्थेच्या खर्चाचे योग्य नियोजन,गुणवत्तापूर्ण व दीर्घकाळ टिकणारे बांधकाम व पारदर्शक कारभार यासाठी एक स्वतंत्र सभा बोलवून या विषयावर विस्तृत चर्चा व्हावी,अशी मागणी अनेक सभासदातून होत आहे.यामध्ये गोडाऊनमधून आतापर्यंत संस्थेला झालेलं उत्पन्न, तसेच भविष्यातील अपेक्षित उत्पन्न याची माहितीही सभासदांसमोर ठेवावी, असे मत मांडण्यात आले.संस्थेच्या हितासाठी निर्णय प्रक्रियेत सभासदांचा सहभाग असावा, खर्च व कामकाजातील पारदर्शकता जपली जावी व कोणताही निर्णय एकतर्फी घेऊ नये, अशी भूमिका सभासदांची आहे.संस्थेचे गोडाऊन हे महत्त्वाचे उत्पन्नाचे साधन असल्याने त्याच्या दुरुस्तीसंबंधी निर्णय अत्यंत विचारपूर्वक व चर्चेअंती घ्यावेत,असे ठाम मत नाव न घालण्याच्या अटींवर अनेक सभासदांनी मत व्यक्त केले आहे.