कोल्हापूर / प्रतिनिधी
1993 पासून कोल्हापुरी क्लस्टरच्या व्यावसायिकांनी ‘विश्व पंढरी’ समोरील जागेसाठी सातत्याने प्रयत्न करत कागदपत्रांसह प्रस्ताव शासन व मंत्रालयाकडे सादर केला असून सदर जागा अधिकृतरीत्या मंजूर झालेली आहे.मात्र,आमदार अशोकराव माने यांनी प्रशासनावर प्रचंड पैसा आणि राजकीय दबाव वापरून ही जागा त्यांचा महिला उद्योग संस्थेसाठी हडप केल्याचा आरोप कोल्हापुरी क्लस्टरचे अध्यक्ष अशोक गायकवाड यांनी केला आहे.आयोजित पत्रकार परिषदेत गायकवाड म्हणाले की, “सदर जागा आमच्या अस्तित्वाचा आणि स्वाभिमानाचा प्रश्न आहे.आमची ३२ वर्षांची मेहनत, कागदपत्रे आणि सर्व प्रक्रिया पार पाडूनसुद्धा जर आमचा हक्क नाकारला जात असेल, तर आम्ही तीव्र आंदोलनाचा मार्ग पत्करू. प्रसंगी आत्मत्येसारखा निर्णय घ्यावा लागला तरी मागे हटणार नाही.”“आमदार अशोकराव माने यांचा कोल्हापूर शहराशी काहीही संबंध नाही. तरीही ते या शहरातील हक्काची जागा हस्तगत करत आहेत.त्यांनी कोल्हापूरसाठी नेमकं काय केलं हे कोल्हापूरकरांनी विचारावं.आम्ही गावोगावी आंदोलन छेडून त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर आणू,” असा इशारा गायकवाड यांनी दिला.यामुळे ‘विश्व पंढरी’ समोरील जागेचा वाद चांगलाच पेटण्याची चिन्हे आहेत.कोल्हापुरी क्लस्टरच्या या लढ्यामुळे आमदार माने यांची राजकीय डोकेदुखी वाढणार असून येत्या काळात त्यांच्याविरोधात जिल्हाभर आंदोलनांची शक्यता निर्माण झाली आहे