इचलकरंजी | प्रतिनिधी
इचलकरंजी महानगरपालिका आरोग्य विभागाची कोणतीही परवानगी अथवा वैद्यकीय पदवी नसताना औषधांची विक्री व आरोग्य तपासणी केल्याप्रकरणी सहाजणांविरुद्ध गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यामध्ये तीन महिलांचा समावेश आहे.उचगाव (ता. करवीर) येथील ‘रत्नोत्रय आयुर हेल्थ केअर’ या संस्थेच्या नावाने आरोग्य सल्लागार गणेश शशिकांत बारटक्के, हेल्थ अॅडवायझर रवीराज रामचंद्र कवाळे, तेजस वीरुपाक्ष जंगम, वनिता अशोक पोवार, तंझीला तौफिक रुकंदे आणि सायली शुभम पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.या प्रकरणी इचलकरंजी महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार यांनी गावभाग पोलिसात फिर्याद दिली आहे.शहरातील पि.बा.पाटील मळा परिसरात आरोग्य तपासणी व औषधवाटप केल्याची माहिती महानगरपालिकेला मिळाल्यानंतर तपासणी करण्यात आली.यावेळी संबंधित व्यक्तींनी नागरिकांकडून २० रुपयांची पावती देत विविध सिरप,गोळ्या व औषधांचे वितरण केल्याचे निष्पन्न झाले.यामध्ये रत्नलीव सिरप, दिव्या अमृत, नारी सखी सिरप, सुवर्णप्राश ड्रॉप, अर्थोरत्न टॅब्लेट आदी औषधांचा समावेश असून एकूण ३ हजार ३१० रुपयांची औषधे वितरीत करण्यात आली होती. ही औषधे देताना संबंधितांकडे कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र अथवा मान्यता नसल्याचे स्पष्ट झाले.संबंधित सहाजणांविरोधात मानवी जिवीताला धोका पोहोचवणाऱ्या कृत्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून अधिक तपास गावभाग पोलीस करत आहेत.