म्हैसाळ / प्रतिनिधी
कृष्णा नदीवर म्हैसाळ-कनवाड दरम्यान सुरू असलेल्या बॅरेजच्या कामामुळे कनवाड हद्दीतील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर जमीन वाहून गेली आहे.मागील दोन वर्षांपासून हे काम सुरू असून ठेकेदाराने म्हैसाळ बाजूस नदीमध्ये बांध घातला होता.पावसाळा सुरू होण्यापूर्वी तो बांध काढणे आवश्यक होते,मात्र ठेकेदाराने तो न काढल्यामुळे जून महिन्यात गट क्रमांक 191 ते 200 या गटातील जमीन पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली.दररोज पाण्याच्या प्रवाहामुळे सुमारे ५० ते १०० फूट जमीन ढासळत असून महसूल, कृषी व पाटबंधारे विभागाने घटनास्थळी पंचनामा केला आहे.मात्र अद्यापही ठेकेदारावर कोणतीही कारवाई झालेली नाही व शेतकऱ्यांना एक रुपयाही मोबदला मिळालेला नाही. भविष्यात या बॅरेजमुळे परिसराला गंभीर धोका संभवतो.त्यामुळे शासनाने रीतसर भूसंपादन करून संरक्षक भिंत उभारण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.परंतु गेल्या दोन महिन्यांपासून शासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे शेतकऱ्यांत तीव्र नाराजी आहे.या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी नायब तहसीलदार क्रांती पाटील आणि सांगली पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रकांत पाटोळे यांना आज निवेदन दिले.जोपर्यंत शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नाही आणि संरक्षक भिंतीसाठी भूसंपादन होत नाही,तोपर्यंत बॅरेजचे काम थांबवण्याची मागणी यावेळी करण्यात आली.अन्यथा शेतकऱ्यांना कायदा हातात घेऊन आंदोलन करावे लागेल,असा इशाराही देण्यात आला.यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील,राकेश जगदाळे, मुस्तफा इनामदार,अभिजीत पाटील,संभाजी माने,रशीद मुल्ला,प्रवीण माने,अनिल हुपरीकर,अवधूत काळे, परसराम कांबळे आदी उपस्थित होते.