पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
पुलाची शिरोलीचे माजी सरपंच तात्यासाहेब भाऊसाहेब पाटील यांनी पत्नी कै. निलावती पाटील यांच्या उत्तर कार्यादिवशी फोटो पूजन करून विविध सामाजिक उपक्रम राबविले. या उपक्रमातून पाटील यांनी समाजापुढे एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
सौ निलावती पाटील यांच्या निधनानंतर त्यांची रक्षा नदीत न सोडता आपल्या शेतामध्ये टाकून पर्यावरण जपण्याचा प्रयत्न केला आहे. तर उत्तरकार्या दिवशी सामाजिक कामात कार्यरत असलेल्या ग्रामपंचायतीच्या झाडू कामगार महिला व आशा स्वंयसेवक महिलांना साडी वाटप, प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना फळे वाटप, पर्यावरण प्रेमी लोकांना रोपांचे वाटप, शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप, ज्येष्ठ लोकांना आरोग्य मार्गदर्शन पुस्तकांचे वाटप, अनाथ मुलांच्या संस्थेला आर्थिक मदत, एकाच मुलीवर कुटुंब नियोजन व बेटी बचाव- बेटी पढाव या संकल्पनेतून गरीब मुलींना ठेव पावतीचे वितरण व भुयेवाडीच्या सरपंच सौ. राणी पाटील यांचे ‘आई’ या विषयावरील व्याख्यान.आदी सामाजिक उपक्रम तात्यासो पाटील यांनी राबवून पत्नी कै. निलावती पाटील यांना आदरांजली वाहण्याचा त्यांनी छोटासा प्रयत्न केला आहे. व या उपक्रमातून त्यांनी समाजापुढे एक आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे.त्यांच्या या उपक्रमास शिवाजी व धनाजी या मुलांनी प्रोत्साहन दिले.