कुरुंदवाड / प्रतिनिधी
येथील पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सागर पवार यांना नुकतीच सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती मिळाली आहे. त्यांच्या या यशामुळे पोलिस दलामध्ये तसेच स्थानिक पातळीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.सागर पवार हे मूळचे सातारा जिल्ह्यातील चिंचणी गावचे रहिवासी आहेत. सन 2015 मध्ये त्यांनी स्पर्धा परीक्षेद्वारे पोलीस उपनिरीक्षकपदी यश संपादन केले. यानंतर त्यांनी मुंबई तसेच नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात खडतर सेवा बजावली. त्या काळात त्यांनी अत्यंत जिद्दीने व निष्ठेने कर्तव्य पार पाडत पोलीस दलाचा गौरव वाढविला.
गडचिरोलीतील सेवेनंतर ते कोल्हापूर जिल्ह्यात बदलीवर आले आणि येथे त्यांनी सायबर गुन्हे शाखेच्या माध्यमातून सांगली व परिसरात उल्लेखनीय कामगिरी बजावली. विविध सायबर गुन्ह्यांचा छडा लावत अनेक गुन्हेगारांना गजाआड केले. त्यांच्या तांत्रिक कौशल्यामुळे अनेक गुंतागुंतीच्या गुन्ह्यांची उकल सुलभ झाली.
विशेष म्हणजे, चोरीच्या गुन्ह्यांमध्ये त्यांनी सहकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या मदतीने अवघ्या 24 तासांत आरोपींचा शोध लावत मुसक्या आवळल्या. त्याचबरोबर इतर गुन्ह्यांमध्येही आरोपींना केवळ 12 तासांच्या आत अटक करून त्यांनी कार्यक्षमतेचा ठसा उमठविला आहे.सागर पवार यांची ही पदोन्नती ही त्यांच्या अथक मेहनत, चिकाटी, आणि कर्तव्यपरायणतेचं मूर्तिमंत उदाहरण आहे.