पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
विद्युत खांबावरून पडल्याने परप्रांतीय कामगाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गालगत टोप येथील मटण मार्केटच्या मागील बाजूस घडली. दुपारी चार वाजण्यासुमार हा अपघात घडला . मयत व्यक्तीचे नाव निलेश सुभाष जाधव ( वय २१ मुळगाव रा. मध्यप्रदेश ) असे आहे .
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी कि महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनीने विद्युत खांबांचे दुरूस्तीचे काम बारामती येथील व्ही व्ही पोवार इलेक्ट्रिकल कंपनीला दिले आहे या कंपनीकडून टोप येथील मटण मार्केटच्या मागील बाजूस असणाऱ्या खांबावर पावसामुळे तांत्रिक बिघाड झाल्याने तो दुरूस्त करण्यासाठी निलेश हा खांबावर चढला होता. दुरूस्ती करत असताना त्याचा अचानक खांबावरून तोल गेल्याने तो जवळपास २५ फुटांवरून खाली जमिनीवर कोसळला .
तो गंभीर जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी पेठवडगाव येथील खाजगी रूग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे येथील डाॅक्टरांनी सांगितले . घटनास्थळी महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनी कोल्हापूर येथील सहाय्यक अभियंता टी ए बागवान व टोप शाखेचे सहाय्यक अभियंता किरण नरले यानी धाव घेवून घटनेची पाहणी केले .
आज विद्युत खांबावरील तांत्रिक बिघाड काढण्यासाठी दुपारी अडीच वाजल्यापासून गावातील विद्युत पुरवठा खंडीत ( बंद ) करण्यात आला होता पण या अपघाती घटनेमुळे टोप गावातील नागरिकांना रात्री उशिरापर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी वाट पहावी लागली .