तुमच्या समस्या मांडा, त्याच दिवशी मिळणार उत्तर!
जिल्ह्यात ‘नागरिक समस्या समाधान अभियान’ची प्रभावी अंमलबजावणी सुरू
हातकणंगले / सुकुमार अब्दागीरे
जिल्ह्यातीलप्रत्येक तालुकास्तरावर नागरिकांच्या समस्यांचे तात्काळ निराकरण करण्यासाठी ‘नागरिक समस्या समाधान अभियान’ राबवले जात आहे. या अभियानाअंतर्गत प्रत्येक शासकीय कार्यालयात एक स्वतंत्र कक्ष तयार करण्यात येणार असून, नागरिकांनी त्याठिकाणी आपल्या तक्रारी सादर केल्या तर त्याच दिवशी त्या समस्यांवर उत्तर दिले जाणार आहे.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या अभियानाचा शुभारंभ केला असून, ११ प्रकारच्या शासकीय कार्यालयांत नागरिकांच्या समस्या स्वीकारण्यासाठी ही योजना राबवली जाणार आहे. हे अभियान दर मंगळवारी राबवले जाणार असून, यामध्ये विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, पालिका व पंचायत समित्यांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
दृष्टीक्षेपात अभियानाचे मुद्दे:
शासकीय कार्यालयात स्वतंत्र कर्मचारीसह कक्ष उभारणे
तक्रारी लिहून घेणे व प्राप्त झाल्याबरोबर कार्यवाही सुरू करणे
३० मिनिटांत उत्तर न मिळाल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत तोडगा काढणे
जनतेला त्वरित उत्तर मिळण्याची खात्री
तालुकास्तरीय समिती: या समितीत तहसीलदार (अध्यक्ष), गटविकास अधिकारी, पालिका मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, पोलीस अधिकारी आदींचा समावेश असणार आहे.
प्रमुख उद्दिष्ट:
शासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी करणे, समस्यांचे तत्काळ निराकरण करणे आणि जनतेचा शासन यंत्रणांवरचा विश्वास वाढवणे.
हे अभियान सर्व शासकीय कार्यालयांना सूचित करण्यात आले आहे. त्यामुळे आता कोणतीही समस्या न सांगता राहणार नाही, कारण “तुमची समस्या, त्याच दिवशी उत्तर” हीच या अभियानाची खरी ओळख ठरणार आहे.