पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे
पुलाची शिरोली येथील प्राथमिक व माध्यमिक विद्यालय विलास नगर पुलाची शिरोली या शाळेने विठ्ठलाच्या दिंडीचे आयोजन केले होते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी श्री विठ्ठलाची पालखी व दिंडी या प्रशालीच्या भव्य मैदानातून विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराकडे निघाली. या दिंडीमध्ये इयत्ता बालवाडी ते नववी पर्यंत चे सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते. त्याचबरोबर शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते. शाळेतील विद्यार्थी श्री विठ्ठल रुक्मिणी , संत तुकाराम,संत ज्ञानेश्वर,संत एकनाथ संत जनाबाई, मुक्ताई व वारकरी वेशभूषेत आलेली होती. या पायी दिंडी व पालखी सोहळ्याचे नियोजन शाळेचे संस्थापक सदाशिव पाटील व शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत वाकरे कर, तज्ञ संचालिका सौ.प्रतिभा पाटील यांच्या मार्गदर्शनातून केले. या संपूर्ण दिंडीचे नियोजन कुंडलिक जाधव, व प्रदीप गुरव व सर्व शिक्षक यांनी केले. शाळेच्या मैदानातून नामाच्या गजरात, टाळ मृदंगाच्या वाद्यात दिंडी मंदिराकडे निघाली. शाळेतील सर्व महिला शिक्षिका यांनी दिंडीचे पूजन केले. तसेच ठिकठिकाणी ग्रामस्थांनी दिंडीचे पूजन व पायावरती पाणी घातले. विद्यार्थी देहभान विसरून विठ्ठल नामाच्या गजरात रममान झाले. नऊवारी साड्या नेसून आलेल्या विद्यार्थिनींनी व शिक्षकांनी भव्य चौकात फुगडी चा ठेका धरला. दिंडी विठ्ठल मंदिरात गेल्यानंतर सर्वांचे माय माऊली विठू माऊली चे दर्शन घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी विठ्ठलाचे अभंग म्हटले. लहुजी श्रावस्ती यांनी केशवा माधवा ही प्रार्थना म्हटली. सर्व विद्यार्थ्यांना चिरमुरे व फरसाणा यांचा प्रसाद म्हणून शाळेतील सर्व शिक्षकांच्या वतीने वाटण्यात आले. यानंतर पुन्हा दिंडी शाळेकडे परत निघाली. जय जय राम कृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, पांडुरंग पांडुरंग व ज्ञानोबा तुकोबा पांडुरंग अशा गजरात दिंडी परत शाळेत आली. दिंडीचे उत्कृष्ट नियोजन कुंडलिक जाधव, प्रदीप गुरव, श्री लहू श्रावस्ती, शशिकांत पाटील यांनी केले. दिंडीचे भव्य रूप पाहून चौगुले मेडिकलचे मालक श्री अभिजीत चौगुले यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेटचे खाऊवाटप केले. शेवटी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सविता पाटील यांनी सर्व विद्यार्थी पालक व चौगुले मेडिकल यांचे आभार व्यक्त केले. या सर्व कार्यक्रमांमध्ये सर्व शिक्षक व शिक्षिका यांचे सहकार्य अनमोल लाभले. तसेच शाळेचे शिपाई श्री गणेश कांबळे, सौ.वंदना कांबळे,ओंकार देसाई यांचे देखील विशेष सहकार्य लाभले.